डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या जागी वर्णी ः केंद्र सरकारकडून 5 वर्षांसाठी नियुक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसला (एम्स) नवीन संचालक मिळाला आहे. केंद्र सरकारने डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या जागी हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन एम. श्रीनिवास यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. श्रीनिवास 2016 मध्ये हैदराबादच्या ईएसआयसी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी दिल्लीतील एम्समध्येच बालरोग शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होते.
डॉ. श्रीनिवास यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. श्रीनिवास यांची एम्स, नवी दिल्लीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षांसाठी किंवा 65 वर्षे वयापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.
डॉ. एम. श्रीनिवास एम्समधील बालरोग विभागाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 2016 मध्ये ते ईएसआयसी हॉस्पिटलचे डीन झाले. कर्मचारी राज्य विमा कंपनी रुग्णालयाला त्याच्या बिघडलेल्या स्थितीतून सोडवण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये डॉ. श्रीनिवास यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर डॉ. श्रीनिवास यांनी अवघ्या तीन वर्षात ईएसआयसी रुग्णालयातील स्थितीमध्ये बदल घडवत सर्वांत व्यस्त रुग्णालय बनवले होते.









