बेळगाव : कोणतेही काम नकारात्मक भावनेने करायला गेल्यास त्याने निश्चितच ताण वाढणार आहे. आपल्याला जे पटत नाही ते करावे लागले तर ताण वाढतो. त्या ऐवजी स्वीकार करा, आणि त्या कामाचा आनंद घ्या. आपल्या चाकोरीतील चौकटीतून बाहेर येऊन काही सामाजिक कार्य करा. जेणेकरून ताण कमी होईल आणि हृदयसुद्धा सुरक्षित राहील, असा सल्ला अरिहंत हॉस्पिटलचे कार्यकारी वैद्यकीय संचालक व नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी दिला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सुरू असलेल्या दुर्गामाता दौडमध्ये दि. 29 रोजी जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून डॉ. दीक्षित यांनी दौडमधील तरुणाईला मार्गदर्शन केले. धर्मवीर संभाजी चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, पूर्वी साठी उलटल्यानंतर वेगवेगळे आजार उद्भवत असत. परंतु आज वयाचे बंधन राहिले नाही. हृदयरोगालासुद्धा वयाचे बंधन उरले नसून शालेय दशेतील विद्यार्थ्यांपासून कोणालाही हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ लागला आहे. याचे मुख्य कारण ताण आणि बैठी जीवनशैली हे आहे.
तणावमुक्त राहण्यासाठी 6 ते 8 तास पुरेशी झोप आवश्यक आहे. झोपेच्या आधी 2 ते 3 तास लॅपटॉप, मोबाईल यांना कटाक्षाने दूर ठेवण्याची सवय लावून घ्यावी. छत्रपती शिवराय व धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. त्यांनी आपले शरीर सुदृढ व निरोगी ठेवले, त्याचे अनुकरण त्यांच्या मावळ्यांनी केले. आपण त्यांचा वारसा जपत दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत आहात तर त्यांच्या प्रमाणे आपले आरोग्य निरोगी ठेवणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. अलीकडे मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे झोपेचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. लहान वयातच मुले व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन मुलांच्या सवयीकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. लहान वयातच त्यांना मैदानी खेळाकडे वळविल्यास त्यांची शारीरिक चपळता वाढून वेगवेगळ्या रोगांपासून ते दूर राहू शकतील. ही सवय आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी पूरक ठरते. शिवाय मुलांच्यावर अनावश्यक अपेक्षांचे ओझे लादू नये. प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्यामुळे तुलना टाळावी. शिवाय लहान मुलांनीच नव्हे तर सर्वांनीच मैदा, मीठ आणि तेल यांच्या वापरावर नियंत्रण ठेवावे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.









