पुणे / प्रतिनिधी :
हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक प्रदीप कुरूलकर यांच्या पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणीच्या मागणीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. याची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यावेळी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दि. 4 मे रोजी डॉ. कुरूलकर यांना अटक केली. सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी केली गेली. दरम्यान डॉ. कुरुलकरांकडून तपासास अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली. त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयाला सादर केला आहे.
या प्रकरणात डॉ. कुरूलकर तपासास सहकार्य करत नाहीत. तपासास गती येण्यासाठी या चाचण्या करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. यास बचाव पक्षाचे वकील ऍड. ऋषिकेश गानू यांनी विरोध केला. या चाचण्या करण्याची आवश्यकता नाही. या चाचण्या करताना आरोपीला राज्य घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आता यावर पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे.








