कन्नड अभिनेते रविचंद्रन यांचे गौरवोद्गार : अंकली येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन : कुटुंब-राजकारणापलीकडे संस्था कार्यरत
चिकोडी : आनंद म्हणजे केवळ आपण हसणे असे नसून इतरांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविणे आहे. हे काम मोठे असून डॉ. प्रभाकर कोरे यांनी स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविण्याचे ध्येय ठेवून काम केल्याने ते सर्व कार्यांमध्ये यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार कन्नड चित्रपट अभिनेते रविचंद्रन यांनी काढले. अंकली (ता. चिकोडी) येथे केएलई संस्थेच्या एस. के. पाटील कन्नड शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षण घेतलेल्या अंकली येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या नूतनीकरण इमारतीचे उद्घाटन व अंकली येथील डॉ. प्रभाकर कोरे यांनी स्थापन केलेल्या मयूर चित्र मंदिराचा सुवर्ण महोत्सव अशा संमिश्र कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी, अंकलीसारख्या छोट्या गावात 152 वर्षे जुनी सरकारी कन्नड शाळा असून कोट्यावधी रुपये खर्च करून या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या कन्नड शाळा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. 109 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या केएलई संस्थेच्या आज कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व देशभरात 317 शाखा कार्यरत आहेत. यामध्ये 1 लाख 48 हजार विद्यार्थी गुणात्मक व दर्जेदार शिक्षण घेत असून शिक्षण व आरोग्य सेवा या दोन्ही महत्त्वाच्या कार्यांसाठी केएलई संस्थेने वाहून घेतले आहे.
तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये शिक्षणाची मोठी गैरसोय होत असताना मुंबई प्रांतात असलेल्या वेळी सप्तर्षी पुणे येथे जाऊन उच्चशिक्षण घेतले. त्या काळातील नोकरी सोडून केएलई शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये 13000 सभासद असून देश-विदेशातील विद्यार्थ्यांना येथे वैद्यकीय शिक्षण दिले जात आहे. बेंगळूरप्रमाणे ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षणासोबतच व भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत. 1996 साली संस्थेने आरोग्यसेवा सुरू केली असून बेळगावसह गोकाक, चिकोडी, हुबळी, अंकोला, पुणे, बेंगळूर येथे सुमारे 5000 बेडच्या रुग्णालयांची सेवा सुरू आहे. पक्षभेद विसरून लोकशाही मार्गाने ही संस्था चालवली जात आहे. या संस्थेने राज्याला तीन मुख्यमंत्री, सुधा मूर्ती यांच्यासारख्या उद्योजिका तसेच मुरुगेश निराणी यांच्यासारखे उद्योजक दिले आहेत. कुटुंब व राजकारणापलीकडेही जाऊन संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चित्रपट निर्माते नागतीहळ्ळी चंद्रशेखर, अभिनेता डॉली धनंजय, अभिनेत्री अनुपमा प्रभाकर, अभिनेत्री सप्तमी गौडा, मंड्या रमेश, अभिनेत्री अमूल्या, विधान परिषद सदस्य मुरुगेश निराणी, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कौजलगी, राजू मुन्नोळी, बी. जी. देसाई, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक, अंकलीचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कलाकारांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अभिनेतेवर्गाने कोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. रात्री 8.30 नंतर विजय प्रकाश व त्यांच्या पथकाचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.









