फोंडा : भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि इथल्या पारंपारिक कलांच्या माध्यमातून समृद्ध लोकजीवनाचे रक्षण हे उद्दिष्ट उराशी बाळगून संपूर्ण देशभर सायकल प्रवास करणारे पद्मश्री डॉ. किरण सेठ यांनी बुधवारी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. ‘स्पिक मॅके’ या संकल्पनेतून साकारलेला हा संस्कृती प्रकल्प फर्मागुडी येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांनी चर्चात्मक कार्यक्रमाच्या आधारे अवगत केला. संगीत हे आपल्या अंतर्मनाशी जोडल्याचे ते म्हणाले. 73 वर्षीय डॉ. किरण सेठ यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी काश्मिरहून एका साधारण सायकलवरून प्रवास सुरु केला होता. या प्रवासा अंतर्गत त्यांनी अनेक शिक्षण संस्थाना भेटी देऊन लोककला, ध्यान, योग, चर्चासत्रे, कार्यशाळा, चित्रकला, शिल्पकला, संगीत व तत्सम विषयांचा प्रसार केला. आजची पिढी निरामय, सुदृढ असावी, व्यसनमुक्त असावी हा ध्यास घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना व तरुणांना एकत्र आणण्याचा आणि त्यातून निष्कलंक जीवन जगण्याचा मंत्र दिला. यावेळी बोलताना डॉ. सेठ म्हणाले, वर्षातून संपूर्ण भारतातील शंभरहून अधिक शहरांमधून साधारण पाच हजारांपेक्षा अधिक उपक्रम ‘स्पिक मॅपे’ या संस्थेमार्फत राबविले जातात. वर्ष 2030 पर्यंत संपूर्ण भारतात ही संकल्पना रुजली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांना चांगले संगीत ऐकविणे किंवा श्रवणाची रुची त्यांच्यामध्ये निर्माण करणे आणि त्याद्वारे आरोग्यसंपन्न भारताचे नवनिर्माण करणे हे आपले ध्येय आहे. ‘उच्च विचार आणि सामान्य जीवनमान’ हे गांधीवादी तत्व आपल्याला विशेष भावते. गोव्यात राज्य समन्वयक म्हणून काम करणारे गणेश हेगडे हे उत्तम काम करीत असल्याचे ते म्हणाले. ‘स्पिक मॅके’ ही स्वयंस्फूर्त काम करणारी संस्था असून नवीन पिढीला चांगली दिक्षा देण्याचे कार्य ही संस्था करीत असल्याचे श्री. सेठ म्हणाले. 19 फेब्रु. रोजी आपण कन्याकुमारीला पोहचलो. आता पुढील प्रवासाच्यावेळी बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी शहरातून तरुण विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन आपल्या संस्कृतीच्या उद्धारार्थ काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपली ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अॅण्ड कल्चर अमंगस्ट युथ’ (स्पिकमॅके) ही संस्था गेली पंचेचाळीस वर्षे युवावर्गाच्या उज्ज्वल आणि निरामय भवितव्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.









