सावंतवाडी / प्रतिनिधी
एनर्जी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनचे घटक असलेली थंड पेये बाजारात आली आहेत. दहा वीस रुपयांत ही पेये मिळत आहेत. सौम्य प्रकारची नशा होत असल्याने लहान मुले, महिला, पुरुषही या ड्रिंक्सच्या आहारी जात आहेत. वारंवार मुलांकडून याची मागणी होत आहे. हे पेय पिल्यानंतर ताजेतवाने तसेच नशा आल्यासारखी वाटते असे सांगण्यात आले.सहज व कमी पैशात हे पेय मिळत आहे. विद्यार्थीही रात्री झोप येऊ नये म्हणून याचा आधार घेत आहेत. वाहन चालक, कामगार, मुले मोठ्या प्रमाणात याचे सेवन करत आहेत. हे पेय सेवन केल्यानंतर झोप येत नाही तर शरीरात स्फूर्ती येते. पेय पिल्यानंतर डोळे ताठर होतात आणि गुंगीही येते.
२५० मि.ली.च्या बाटलीत ७५ मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये, अशी नोंदही बाटलीवर आहे. लहान मुले, गरोदर माता, स्तनदा माता यांना धोकादायक असल्याची नोंद त्यावर आहे. बाटल्यांत प्रत्येक १०० मि.ली.ला २९ मिली ग्रॅम कॅफेन असल्याची नोंद आहे. या बाटल्या थेट २५० मिलीच्या आहेत. दिवसभरात पाचशे मिलीपेक्षा जास्त घेऊ, नये असेही करण्यात आले आहे. ही पेये सहज उपलब्ध होत आहेत.
कॅफेन हे शंभर मिली ग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेल्यास जास्त नशा येते. मेंदू, किडनी, मज्जारज्जू निकामी होतो. गरोदर माता, स्तनपान करणाऱ्या मातांनी हे घेऊ नये. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता येते. अशाप्रकारचे कॅफेन असलेले पेय धोकादायक आहे. याबाबत माहिती घेऊन या पेयावर बंदी आणावी अशी मागणी अन्न भेसळ खात्याकडे करण्यात येणार असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.









