सनातन संस्थेतर्फे काढण्यात आली रथातून मिरवणूक
फोंडा : सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा 81 वा जन्मोत्सव ब्रम्होत्सव म्हणून साजरा करण्यात आला. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी मैदानावर झालेल्या भव्य सोहळ्यात डॉ. आठवले यांची सागवानपासून साकारलेल्या सुवर्णरथातून रथयात्रा काढण्यात आली. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून दहा हजारहून अधिक साधक या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात झारखंड येथील पू. प्रदीप खेमका, पू. सुनीता खेमका, दिल्ली येथील पू. संजीवकुमार, पितांबरी उद्योगसमुहाचे रवींद्र प्रभुदेसाई आणि कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक राजन भोबे, म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानचे अध्यक्ष प्रेमानंद कामत, गोमंतक संत मंडळाचे संचालक ह. भ. प. सुहासबुवा वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष भाई पंडित आणि कोकणी साहित्यिक महेश पारकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुऊवातील वर्ष 2021 मध्ये झालेल्या डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा लघुपट दाखवण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या रथयात्रेत धर्मध्वज, मंगलकलश घेतलेल्या सुवासिनी, ध्वजपथक, टाळपथक इत्यादी श्रीमन्नारायण नारायण अशा जयघोषात मिरवणूक काढली. सुवर्णरथात डॉ. आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ती बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती अंजली गाडगीळ विराजमान होत्या. यावेळी नृत्यपथकाने अच्युताष्टकमावर आधारीत नृत्य सादर केले. त्यानंतर आत्माराम आनंदरमणा हे गीत सादर करण्यात आले. रथदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सनातन संस्थेद्वारे देशभरात हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत अनेक प्राचिन मंदिरांची स्वच्छता, शेकडो मंदिरामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना, प्रवचने तसेच अनेक ठिकाणी हिंदु एकता दिंडी काढण्यात आल्या.









