आमदार केदार नाईक यांचे प्रतिपादन : पिळर्ण – मार्रा पंचायतीत सौंदर्यीकरण कामाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पर्वरी
ज्या महामानवाने आपल्या देशाला संविधान दिले, दलितांना, वचिंताना जगण्याचा हक्क दिला, संविधानाच्या माध्यमातून या देशात रामराज्य यावे यासाठी जीवाचे रान केले अशा बाबासाहेबांना एका जातीमध्ये, पंथामध्ये बंदिस्त करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तथागत बुद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी बहुसंख्य हिंदू धर्मियांवर उपकार केलेले आहेत, असे प्रतिपादन आमदार केदार नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनी केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी पिळर्ण-मार्रा पंचायतीचे सरपंच तसेच पंच सदस्य व जन शिक्षण संस्थान गोवाचे संचालक श्रीहरी आठल्ये उपस्थित होते. जन शिक्षण संस्थान गोवा आणि पिळर्ण-मार्रा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावळे-पिळर्ण येथे जन शिक्षण संस्थान गोवा तर्फे घेण्यात आलेल्या ब्युटिथेरपिस्ट कोर्सचे प्रमाणपण वितरण तसेच मंदिराच्या प्रांगणात पंचायतीचे सदस्य अमरनाथ गोवेकर यांच्या पुढाकाराने सौदर्यीकरण कामाचे उद्घाटन आमदार केदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी घटनेमध्ये सेक्मयुल्यारिझम व सोशियालिझम असे शब्द घुसवून बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा अपमान केला आहे. बाबासाहेबांना रामराज्याची स्थापना झालेली पहावयाची होती पण या सर्वधर्मसमभाव व समाजवादी समाजरचना या शब्दांचा अल्पसंख्यांकांचे लांगुनचालन असा अर्थ काढून मतांचे राजकारण केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, बंधुता, एकता या त्रिसुत्रींचे अनुकरण करून समाज घडवूया, असे आवाहन जन शिक्षण संस्थानचे संचालक श्रीहरी आठल्ये यांनी केले.
अमरनाथ गोवेकर, तसेच पंचायतीचे सरपंच व अन्य पंच सदस्यांनी समयोचित विचार व्यक्त केले. निवृत्त मुख्याध्यापक अरूण नागवेकर यांनी सूत्रसंचालय केले व आभार मानले.









