दिंडीत विविध हिंदू संघटनांचा सहभाग : नागरिकांकडून धर्मध्वजावर पुष्पवृष्टी : मुलांकडून विविध वेशभूषा

प्रतिनिधी /बेळगाव
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या 80 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सोमवार दि. 23 रोजी हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. या फेरीत विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभी यल्लाप्पा पाटील यांनी शंखनाद केला. गणेश वंदन आणि देवतांची प्रार्थना करून हिंदू एकता दिंडीत धर्मप्रेमी यल्लोजी पाटील यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करण्यात आले.
डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन अनिता व कल्लाप्पा मोरे दांपत्याने केले. त्यानंतर नाथ पै चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. खडेबाजार, शहापूर, श्यामाप्रसाद मुखर्जी रोड यामार्गे दिंडी जाऊन कपिलेश्वर मंदिर येथे दिंडीची सांगता झाली.
दिंडीच्या समोर धर्मध्वज तर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र व फुलांनी सजविलेल्या वाहनावर श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पारंपरिक पोशाख केलेल्या महिलांनी कलश घेतले होते.
तसेच स्वसंरक्षक पथके, बालसाधक कक्ष, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखविणारे रणरागिणी पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक असे दिंडीचे स्वरुप होते.
रणरागिनी शाखेतर्फे प्रात्यक्षिके सादर
दिंडीच्या मार्गावर नागरिकांनी धर्मध्वजाची आरती करून पुष्पवृष्टी केली. हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे कराटे, लाठीकाठी, दंडसाखळी आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तरुणी आणि लहान मुले छत्रपती शिवराय, राणी लक्ष्मीबाई, ताराराणी, लोकमान्य टिळक यांच्या तसेच श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती.









