सचिवपदी डॉ. राघवेंद्र सागर तर खजिनदारपदी डॉ. केदारेश्वर : नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. हेमंत कौजलगी यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ. राघवेंद्र सागर यांची सचिव तर डॉ. केदारेश्वर के. एस. यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा गुऊवारी सायंकाळी आयएमए हॉलमध्ये पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वैद्य डॉ. बी. बी. पुट्टी उपस्थित होते.
वैद्यकीय व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यावर भाष्य करताना डॉ. पुट्टी म्हणाले, सुमारे 7 दशकांपूर्वी लोक डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहत असत. छोट्या बॅगमध्ये औषधे आणि गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन ते नि:स्वार्थपणे समाजसेवा करत असत. त्याकाळी वैद्यकीय क्षेत्रात आजच्याप्रमाणे कॉर्पोरेट संस्कृती नव्हती. मात्र आज तंत्रज्ञान व कौशल्याच्या प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आज औषध निर्माण कंपन्या, प्रशासकीय अधिकारी, कायदे तज्ञ आणि कॉर्पोरेट्स यांनी वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण मिळविले आहे. तरीदेखील एआय आधारित वैयक्तिक उपचार, टेलिमेडिसिनचा शोध, आजारांचे लवकर निदान यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचे त्यांनी कौतुक करत तऊण डॉक्टरांचे भविष्य निर्धास्त असल्याचे सांगितले. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना डॉ. कौजलगी यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेची सेवा प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि वैद्यकीय नैतिकतेचे पालन करत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. गिरीश सोनवाळकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. माउली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









