गोवा हिंदी आणि महाराष्ट्र विद्यार्थी विकास अकादमीचा पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांना गोवा हिंदी अकादमी आणि महाराष्ट्र विद्यार्थी विकास अकादमीचा गुरुवंदना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे झालेल्या गुरुवंदना राष्ट्रभूषण संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, गोवा विधानसभेचे माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, गोवा हिंदी कला अकादमीचे अध्यक्ष सुनिल शेठ, गडहिंग्लज येथील अनुराधा अर्बन निधी बँक चे संस्थापक अध्यक्ष डॉ हनुमंत शिरगुप्पे, इचलकरंजी येथील वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे, महाराष्ट्र विद्यार्थी विकास अकादमीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष डॉ बी एन खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ चंद्रकांत सावंत यानी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ७८ शाळांमधील १३० विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत ४ लाख १५ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३० मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच डॉ चंद्रकांत सावंत यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज डॉ चंद्रकांत सावंत यांनी स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले. त्यामुळे गेल्या दोन दशकात समाज हितासाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.









