पालिकेच्या राजकारणात एकमेव विरोधक
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा पॅनलने 15 पैकी सर्वाधिक 10 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले तरी दुसऱ्या क्रमाकांवर आलेल्या मगो रायझिंग फोंडा पॅनलने 4 जागा जिंकून फोंड्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावली आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली रायझिंग फोंडा पॅनलने 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 4 जागा जिंकतानाच एकूण 10,653 मतांपैकी 3516 मते मिळवली. विशेष म्हणजे तीन प्रभागांमध्ये अवघ्या काही मतांनी त्यांचा विजय हुकला.
या निवडणुकीत भाजपाने दहा जागांवर विजय मिळवतानाच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणले. तेरा प्रभागात झालेल्या 10,653 मतांपैकी भाजपाला 4,956 मते मिळाली. काँग्रेसने सहा प्रभागांमध्ये उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यांना एकही जागा जिंकता आली नसली तरी 1063 मते मिळाली. तीन प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. अपक्ष उमेदवारही एकदोन प्रभागात तुल्यबळ ठरले. प्रभाग 4 या एकमेव जागेवर अपक्ष उमेदवार व्यंकटेश उर्फ दादा नाईक विजयी झाले. 43 उमेदवारांपैकी आठ प्रभागांतून 12 उमेदवार अपक्ष होते. त्यांना एकूण 1033 मते मिळाली. प्रभाग 5 मध्ये नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे प्रतिस्पर्धी श्रवण सत्यवाना नाईक हे 265 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.
फोंडा नगरपालिकेच्या या निकालातून भाजपा विऊद्ध रायझिंग फोंडा हाच एकमेळ तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी ठरला आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखाली मागील निवडणुकीत रायझिंग फोंडाने सर्वांधिक 7 जागा जिंकल्या होत्या. आमदार तथा मंत्री रवी नाईक यांच्या नेतृवाखाली लढविण्यात आलेल्या पालिका निवडणुकीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बराच जोर लावला. त्यात भाटीकर यांची झुंज एकाकी ठरली. मगो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे योग्य पाठबळ व सहकार्य लाभले असते तर कदाचित रायझिंग पॅनलचे एकदोन अधिक जागांवर बाजी मारली असती. निवडणुकीपूर्वी फोंड्यात झालेल्या ‘हात से हात जोडो’ या काँग्रेसच्या मोहिमेत सर्व पंधराही जागा लढविण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पालिका निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. परिणामी सर्व प्रभागांमध्ये भाजपा व मगो रायझिंग अशीच थेट लढत झाली. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधक म्हणून भाटीकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.









