मुत्सद्दी पंतप्रधान, मुक्त आर्थिक व्यवस्थेचा जनक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक अशा शब्दात अनेकांकडून शब्दसुमनांजली प्रतिनिधी/ बेळगाव
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल सीपीएड मैदानावर शुक्रवार दि. 27 रोजी झालेल्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी मुख्यम़ंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांसह पक्षनेते उपस्थित होते.
डॉ. मनमोहन सिंग यांना डॉ. प्रभाकर कोरेंची श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मनमोहन सिंग म्हणजे देशाने पाहिलेला मुत्सद्दी पंतप्रधान, मुक्त आर्थिक व्यवस्थेचा जनक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले मनमोहन सिंग पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आदी पदांवरून कार्य केले. 1990-95 या काळात आपण राज्यसभा सदस्य असताना मनमोहन सिंग यांना जवळून पाहिले. उत्तम मार्गदर्शक, प्रभावी राजकीय नेते, सुस्वभावी, मितभाषी असे अनेक गुण त्यांच्यात होते. गरिबीतून पुढे अत्युत्तम अर्थतज्ञ, देशाचे सर्वोच्च पंतप्रधानपद भूषविणे ही सर्वसामान्य बाब नव्हे तर सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. आजच्या तऊण पिढीला त्यांचे कार्य आदर्शवत होते.
मनमोहन सिंग यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्यांच्या निधनामुळे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने सिंग कुटुंबाला द्यावी, अशा शब्दात डॉ. कोरे यांनी केएलई परिवारातर्फे श्रद्धांजली वाहिली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना बेळगाव डायोसीसकडून श्रद्धांजली
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल बेळगाव डायोसीसच्यावतीने आवाहन करत चर्च परिसरातील डेकोरेटिव्ह लाईट बंद करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी चर्च परिसरातील डेकोरेटिव्ह लाईट बंद ठेवण्यात आले. तसेच रविवार दि. 29 रोजी सामूहिक प्रार्थना होणार असल्याची माहिती बेळगाव डायोसीसच्यावतीने देण्यात आली आहे.
29 रोजी सायंकाळी 5 वाजता कॅम्प येथील सेंट पॉल्स पीयू कॉलेजच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे. परिसरात एक छोटीशी मिरवणूक काढली जाणार आहे. त्याचबरोबर डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याची माहिती बिशप डेरेक फर्नांडिस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
खासदार प्रियांका जारकीहोळींची श्रद्धांजली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशाच्या विकासात मनमोहन सिंग यांचे मोठे योगदान होते. ते अर्थतज्ञ व देशाच्या आर्थिक सुधारणेतील प्रवर्तक होते. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. मृताच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशा शब्दात खासदार प्रियांका जारकीहोळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.









