कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची ग्वाही
प्रतिनिधी/कोल्हापूर
रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ व्हावे, असे स्वप्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाहिले होते, ते आज सत्यात उतरले आहे. या विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होण्याचा बहुमान मला लाभला, याचा आनंद मोठा आहे. एक रयत सेवक म्हणून विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाची स्थापना केली असून या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरुपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिर्के यांची निवड झाली. त्यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे कुलगुरू डॉ. शिर्के यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शिर्के बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आकारास आले आहे, त्यामागे अनेकांचे योगदान आहे. आता आपली जबाबदारी वाढली असून विद्यापीठ नावारुपास आणण्यासाठी सर्वांना पूर्ण क्षमतेने योगदान द्यावे लागणार आहे. नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे काळानुरुप आवश्यक ते अभ्यासक्रम या विद्यापीठामार्फत सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेबद्दलची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. एस. शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जे. जे चव्हाण यांनी आभार मानले. डॉ. मनिषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे उच्च शिक्षण सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. बी. ए. कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कुलसचिवपदी डॉ. विजय कुंभार
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पदभार स्विकारल्यानंतर डॉ. विजय कुंभार यांची कुलसचिवपदी नियुक्ती केली. विद्यापीठाच्या कामकाजासाठी विविध पदाधिकारी, अधिष्ठाता आणि केंद्र संचालक यांच्या नियुक्त्याही केल्या.









