शनिवारी विद्यापीठात शिव महोत्सव
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 22 एप्रिल रोजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात दुपारी 4 वाजता ‘शिव महोत्सव 2023’ चे आयोजन केले आहे. शिव-जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच नृत्य, गायन, शाहीरी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संकल्पक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी दिली.
शिव महोत्सवामध्ये जिजाऊ शिव प्रेरणा पुरस्काराने निता ढमाले, शिव ताराराणी पुरस्काराने सारिका पाटणकर यांना गौरवण्यात येणार आहे. सारेगमप फेम अंशिका चोणकर यांचे गीत गायन होईल. युवा शाहीर रामानंद उगले, गायक कबीर नाईकनवरे, गायक राजू नदाफ गायक जितू पाटील, गायक रविराज सदाजय यांची एक से बडकर एक गाणी होणार आहेत. तर नृत्यांगणा श्रध्दा शुल्क, प्रयाग चिखलीतील शिलेदार स्वराज्याचे वीर हनुमान तालीम मंडळ व कोल्हापुरातील श्वास ॲकॅडमी यांचा रसिकांची डोळे दिपवणारा नृत्याविष्कार होईल. तसेच निवेदक डॉ. सत्यजित कोसंबी कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. कोडोलीकर आणि शिव महोत्सव समन्वयक मंदार पाटील यांनी केले आहे.









