आपण हातकणंगलेची जागा लढवण्यास इच्छुक नसून कोल्हापूरच्या जागेवरच ठाम असल्याची घोषणा डॉ. चेतन नरके यांनी केली आहे. मी गेली तीन चार वर्षे कोल्हापूर लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असून हातकणंगले मतदारसंघ आपल्यासाठी सोयीचा नसल्याचंही ते म्हणाले.
गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यासाची तयारी करत असलेल्या डॉ. नरके यांनी तशा प्रकारची मोर्चेंबांधणी करताना मतदारसंघामध्ये प्रचार राबवला होता. पण आता बदलत्या राजकिय घडामोडीमध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्याने त्यांच्यासाठी राजकिय पेच निर्माण झाला होता.
पहा VIDEO>>>हातकणंगलेतून लढण्यास चेतन नरकेंचा नकार! ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफर नाकारली
आज कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आपली भुमिका मांडताना डॉ. चेतन नरके यांनी आपली राजकिय दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, ” मी गेल्या तीन चार वर्षांपासून मी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेसाठी तयारी करत आहे. यासाठी मी सारा परिसर पिंजून काढला आहे. त्यामुळे मला कोल्हापूर मतदारसंघातील समस्या आणि अडचणींची योग्य जाणिव आहे. पण मला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून हातकणंगले लोकसभेसाठी तयारी करण्याबाबत विचारले असता मी त्याला नम्रपणे नकार कळवला आहे. कारण हातकणंगले मतदारसंघ मोठा असून फक्त 30 दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “या राजकिय घडामोडीत मी कोल्हापूरच्या रणांगणात उतरणारच असून माझ्या उमेदवारीसाठी 3 ते 4 पक्ष संपर्कात आहेत. अजूनही लोकसभेच्या निवडणुकांची राजकिय समीकरणे स्पष्ट होण्यासाठी बराच कालावधी असल्याने पुलाखालून बरेच पाणी जायचं बाकी आहे. त्यामुळे मी अपक्ष असणार कि कोणाच्या तिकिटावर लढणार हे अजून स्पष्ट नाही. येत्या काळात माझी पुढील राजकिय भुमिका लवकरच स्पष्ट करेन” असे म्हटले आहे.