पर्वरी / प्रतिनिधी
येथील विद्या प्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण, संगणक व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण भावे यांची गोवा विद्यापीठाने आपल्या महाविद्यालय विकास मंडळावर समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आहे.
गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी नुकत्याच काढलेल्या एका आदेशाद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे
महाविद्यालय विकास मंडळाचे समन्वयक या नात्याने महाविद्यालयांच्या विकासासाठी व महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामधील सुदृढ संबंधासाठी प्रयत्न करणे, पदवी अभ्यासक्रमासाठी लघुकालीन व दीर्घकालीन योजना बनवणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विशेषतः विकासासाठीच्या योजना व अन्य योजन राबवण्यासाठी मदत करणे तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यास मदत करणे, महाविद्यालयांचे प्राचार्य व व्यवस्थापनाचे पदाधिकारी यांच्यासाठी परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करणे, महाविद्यालयांना नैमित्तिक भेटी देऊन देऊन त्यांच्या विकासासंबंधी व सुधारासंबंधी सूचना करणे, संलग्नता चौकशी मंडळाला (अफिलिएशन इन्क्वायरी कमिटी) मदत करणे, महाविद्यालय विकास मंडळाच्या कामकाजा संबंधीचा वार्षिक अहवाल तयार करणे, विद्यापीठाचे अकॅडमीक कौन्सिल, कार्यकारी मंडळ तसेच माननीय कुलगुरू यांनी वेळोवेळी सुचवल्याप्रमाणे महाविद्यालयांकडे संबंधित कामे महाविद्यालय विकास मंडळ करत असते.









