प्रतिनिधी/ पणजी
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राजधानी पणजीत राज्यस्तरीय जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, पणजी येथील डॉ. आंबेडकर उद्यानात रविवारी 14 रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सवाला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. हा सोहळा विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, गोवा राज्य तसेच समाज कल्याण खाते गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गोवा राज्य आयोगाचे आयुक्त दीपक करमळकर, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, प्रमुख वक्ते म्हणून सुधाकर किरा बौद्ध, भारतीय बौद्ध महासभा गोवा शाखेचे अध्यक्ष एस. के. जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोवाचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गोवाच्या अध्यक्षा वासंती परवार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा कोरगावकर, अध्यक्ष सतीश कोरगावकर उपस्थित राहणार आहेत.
या जयंती सोहळ्यात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी देशासाठी दिलेले योगदान तसेच समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खर्ची घातलेले आयुष्य या विषयावर प्रमुख वक्ते सुधाकर किरा बौद्ध भाष्य करणार आहेत.









