विविध कार्यक्रम साजरे ; जय भीम युवक कला क्रीडा मंडळ आणि महिला बचत गटांचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील जय भीम युवक कला क्रीडा मंडळ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आणि गौतम बुद्ध पोर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, उत्कर्षां गावकर, ओटवणे गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत डॉ. अनिल सरमळकर,ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, संजना जाधव, प्रसिद्ध गायक अमित तांबुळकर, न्हानु जाधव, सत्यवान जाधव, जगन्नाथ जाधव, शरद जाधव, समीर गावकर, पांडुरंग जाधव आदी मान्यवर हजर होते. यावेळी प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत डॉ. अनिल सरमळकर यांनी समाज परिवर्तन घडविण्यासाठी आपल्या विचाराबरोबर आचरणात बदल घडणे गरजेचे असून त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बुध्दाचे विचार मार्गदर्शक आहेत. त्या दृष्टीने मार्गक्रमण केल्यास प्रत्येकाच्या आयुष्याचे सोने होणार असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र म्हापसेकर, उमेश गावकर, पत्रकार महेश चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. यावेळी सरपंच आत्माराम गावकर, गायक अमित तांबुळकर, डॉ. अनिल सरमळकर यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अमित तांबुळकर यांनी विविधांगी भिम गिते सादर करीत रसिकाना मंत्रमुग्ध केले. यावेळी तेंडोली येथील कलांकुर ग्रुपने सामाजिक परिवर्तनवादी, सामाजिक संदेश देऊन डोळ्यात अंजन व अश्रू आणणारी “दादरा “ही एकांकिका सादर केली. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्त सकाळी प्राथमिक शिक्षक सत्यवान जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील, त्रिसरण कार्यक्रमानंतर मुलांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे नियोजन जय भीम युवक कला क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वाडीतील सर्व महिला बचत गटांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लुमा जाधव यांनी तर आभार सिताराम जाधव यांनी मानले.









