डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. किरण ठाकुर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती : ‘लोकमान्य’कडून आयोजन
पुणे : ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ आणि ‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’च्यावतीने सुप्रसिद्ध लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधल्या काळे सभागृहात अमृतसिद्धी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गोडबोले यांची जवळपास 65 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीच्या या कार्यक्रमास अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, लेखक, नाटककार आणि वक्ता डॉ. आनंद नाडकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी उदयोन्मुख कलाकार मेहेर परळेकर आणि जागृती संस्थेच्या जयश्री काळे यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी काही पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. आभा औटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता भैरवी गायनाने झाली.








