डॉ. ए. डी. जाधव यांनी उभारला घराच्या बागेत नैसर्गिक अधिवास; शिवाजी विद्यापीठ पसिरातील विविध पक्ष्यांच्या 50 प्रजातींचा अभ्यास
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या ठिकाणी असणाऱया नैसर्गिक अधिवासात असंख्य जातीच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांच्या जातींचे, वैशिष्ठय़ांचा अभ्यास करताना त्यांना थेट आपल्या घरातच घरटे बांधून देणारा प्राणीशास्त्राचा अभ्यासक, संशोधक पक्षीमित्र शिवाजी विद्यापीठाच्याच कॅम्पसमध्ये आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. ए. डी. जाधव हे या पक्षीमित्राचे नाव.
पक्षांना संरक्षणासाठी झाडी आणि खाण्यासाठी धान्यासह कीटक मिळाले की, त्यांचा आधिवास वाढतो. विद्यापीठात अनेक प्रकारचे पक्षी असून डॉ. जाधव यांनी आपल्या सदनिकांमध्येही राळे, ज्वारी, सूर्यफुल, कडधान्यांसह पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरातही विविध जातींच्या पक्ष्यांचा आधिवास निर्माण झाला. यातील पक्ष्यांचे निरीक्षण, वैशिष्ठय़े आणि प्रजातीची ओळख यांचा अभ्यास ते करत आहेत. शिवाजी विद्यापीठात जास्तीत जास्त मोर, लांडोर, पाणकोंबडी, बटेर, निलकंठ, राजहंस, सुगरण, बुलबुल, साळुंकी, मैना, घुबड, पिंगळा आदी 50 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. त्यांचा अभ्यास करून डॉ. ए. डी. जाधव यांनी प्रत्येक पक्ष्याच्या छायाचित्रावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती दिली आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून क्युआर कोड स्कॅन केला की संबंधित पक्षांची शास्त्रीय माहिती उपलब्ध होते. विद्यापीठात या पक्षांचे फोटो लावले आहेत. तसेच पक्षांचे संवर्धन करण्यासाठी राज्य जैवविविधता मंडळातर्फे राज्यभरातील प्रत्येक वनअधिकाऱयांना त्यांच्या हद्दीत पक्ष्यांना पुरेसे खाद्य, पाण्याची व्यवस्था करावी. पक्ष्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी कुरण व कीटकरूपी खाद्य तयार करावे, भारव्दाज पक्षी बहुतेक पक्षांची अंडी आणि पिल्ले खातो, त्यामुळे त्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे. अधिवासात मानवी हस्तक्षेप रोखणे, झाडांवर घरटी बांधणे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी. घराच्या, रहिवासी भागात कृत्रीम घरटी लावून पक्ष्यांचा आधिवास वाढवण्याचा प्रयत्न करावा, आदी पक्षीमित्र होण्यासाठीच्या सूचना डॉ. जाधव करतात. स्वतः कृती केल्यानंतर त्यांनी पक्षी वाचविण्यासाठी केलेले आवाहन पर्यावरणाचे संरक्षण करणार आहे.
जाधव दाम्पत्य बनले पक्ष्यांचे मित्र
डॉ. जाधव यांनी विद्यापीठातील सदनिकेमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याच्या तलावासह राळ, कडधान्य, बाजरी, ज्वारी, पेरू, नाचणीची लागवड केलीय. पक्षी आपल्या गरजेनुसार येतात पाणी पितात, धान्य खातात आणि निघुन जातात. या सदनिका परिसरात काही पक्षांनी घरटीदेखील तयार केली आहेत. त्यातील पिल्ले पावसाळय़ात भिजू नये म्हणून घरटय़ांना प्लास्टिकचे आवरण घातले आहे. पक्षांना इजा झाल्यास त्यांच्यावर उपचार केले जातात. डॉ. जाधव यांच्या या पक्षीमैत्रीत त्यांच्या पत्नी प्रियंका जाधल यांची मोलाची साथ लाभते.
पक्षी मानवाचे मित्र असतात
घुबड, पिंगळा हे पक्षी घराच्या बाजूला आवाज काढत असेल तर त्यांना उसकवून लावू नये. कारण ते साप, उंदीर दिसल्यावर ओरडतात आणि त्यांना खाण्याचे काम करतात. मानवाच्या कल्याणात पक्ष्यांचाही मोठा सहभाग आहे. पक्षी मानवाचे मित्र असतात, त्यामुळे मुलांना बालपणापासूनच निसर्गातील प्राणी, पक्षांची ओळख करून दिली पाहिजे.
डॉ. ए. डी. जाधव (प्राणीशास्त्र, शिवाजी विद्यापीठ)









