वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हान यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सलग तिसऱ्यांना सरकार स्थापन झाल्यानंतर सुलिव्हान हे भारतात येऊन गेले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आदानप्रदानासंबंधी चर्चा केली होती, असे बोलले जात होते. आता पुन्हा त्यांच्यात चर्चा झाली आहे.
भारत आणि अमेरिका यांचे सहकार्य जगासाठी महत्वाचे आहे. तसेच दोन्ही देशांना सध्या जगासमोर असलेल्या आव्हानांशी दोन हात एकत्रितरित्या करावे लागणार आहेत. आज वैश्विक शांतता आणि सुरक्षा यांना मोठे धोके निर्माण होत असून ते वेळीच ओळखणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांचे मत आहे. याच संदर्भात भारत आणि अमेरिका परस्परांशी सहकार्य वाढवित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गार्सेटी यांच्या विधानाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच रशियाचा दौरा केला आहे. रशिया युक्रेनशी युद्ध करत असताना आणि नाटो संघटनेचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा दौरा झाल्याने अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या धोरणात्मक स्वातंत्र्याचा आम्हाला आदर आहे. तथापि, युद्धकाळात धोरणात्मक स्वातंत्र्य असत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या विधानाच्या संदर्भातही अजित डोभाल आणि सुलिव्हान यांच्यात चर्चा झाली असावी, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.









