पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी : पाकिस्तानसोबत वाढतोय तणाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे 30 एप्रिल रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत सामील होणार नाहीत. अलिकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला आहे. याचमुळे डोवाल यांच्या जागी उपराष्ट्रीय सल्लागार पवन कपूर या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव पाहता एनएसए डोवाल हे सध्या विदेश दौरा टाळणार असल्याचे मानले जात आहे. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात ठोस आणि बहुधा निर्णायक कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.
ब्रिक्सच्या या बैठकीत सीमापार दहशतवाद यासारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी निगडित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सीमापार दहशतवाद रोखणे, दहशतवादाचा वित्तपुरवठा बंद करण्याचा मुद्दा या बैठकीच्या मुख्य अजेंड्यात सामील असणार आहे.
विदेश मंत्र्यांचा दौराही अनिश्चित
याचबरोबर विदेशमंत्री एस. जयशंकर हे 28-29 एप्रिल रोजी ब्रिक्स देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत सामील होण्याबद्दल अनिश्चितता आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव पाहता निर्णय घेतला जाणार आहे. परंतु अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. भारताचे ब्रिक्स शेरपा या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे. ब्रिक्सच्या 11 सदस्य देशांचे विदेशमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिळून जुलै महिन्यात होणाऱ्या शिखर परिषदेचा अजेंडा ठरविणार आहेत. या बैठकीत आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आर्थिक मदत, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.









