वृत्तसंस्था/ मॉस्को
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शुक्रवारी मॉस्को भेटीदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन येथे भेट घेतली. सुरक्षा, आर्थिक आणि ऊर्जा सहकार्यावरील द्विपक्षीय चर्चेसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. रशियन राज्य माध्यम स्पुतनिक यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये डोवाल यांनी भारत-रशिया संबंधांना ‘खूप खास’ असे संबोधण्यात आले आहे. पुतीन आणि डोवाल यांच्यातील चर्चेमध्ये दोन्ही देशांमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीवर भर देण्यात आला. ‘आमचे संबंध खूप खास आणि जुने आहेत. आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीला खूप महत्त्व देतो. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीच्या बातमीने आम्हाला खूप आनंद झाला आहे. तारखा जवळजवळ निश्चित झाल्या आहेत’, असेही रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवण्यासाठी अमेरिका भारतावर सतत दबाव आणत असताना डोवाल रशियामध्ये पोहोचले आहेत. डोवाल यांच्या रशिया भेटीनंतर पुतीन यांच्या भारत भेटीची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. डोवाल यांच्यापाठोपाठ आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील चालू महिन्यातच रशियाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात बहुपक्षीय मंचांवर आणि जागतिक सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्यांवर रशिया-भारत यांच्यातील सहकार्यावर विचारांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे.









