दीड महिन्यातच खड्डे पडल्याने प्रश्नचिन्ह
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्ता विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. एक वर्ष तरी खड्ड्यांशिवाय रस्त्यावरून जाता येईल असे वाटत असताना अवघ्या दीड महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने मे महिन्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे भवितव्य पुढे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेळगाव-चोर्ला-गोवा या रस्त्यांपैकी रणकुंडये ते गोवा हद्द म्हणजे चोर्ला रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 58.90 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामधून 43 कि. मी. रस्त्याचे दोन थरांमध्ये डांबरीकरण (म्हणजे डबल कोटींग) तसेच कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नवीन पूल बांधकाम करण्यासाठी हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केवळ 35.30 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात जांबोटी ते कणकुंबी तसेच कणकुंबी ते चोर्ला त्यानंतर जांबोटी ते उचवडे क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात रस्त्याच्या दुसऱ्या थराच्या डांबरीकरणाला सुरुवात केली. मे महिन्यात केलेल्या दुसऱ्या थरातील आमटे, चिखले, पारवाड दरम्यानच्या रस्त्यावरील डांबर उखडून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या महिनाभरात रस्ता उखडल्याने रस्त्याच्या कामाबाबत सांशकता निर्माण झाली आहे.
बेळगाव-गोवा महामार्ग तीनवेळा बंद
कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल काढून नवीन पूल बांधण्यात आला आहे. सदर पुलाचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी मलप्रभा नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी नदी पात्रात दहा पाईप घालून पर्यायी रस्ता बनविला होता. 20 जानेवारीपासून पर्यायी रस्त्यावरूनच वाहतूक सुरू होती. परंतु मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दि. 25 मे रोजी रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी दि. 8 जून रोजी पर्यायी मार्ग खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रविवार दि. 15 जून रोजी पर्यायी रस्ता व पूलच वाहून गेला. या रस्त्याच्या डांबरीकरणाला आक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सुरुवात करण्यात आली. रस्त्यासाठी सरकारकडून 58.90 कोटीची निविदा मागविली होती. त्यानुसार 35.30 कोटींचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. अखेर चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम कंत्राटदाराने 90 टक्के पूर्ण केलेले आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्या भरण्याचे काम शिल्लक राहिल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.
गटारी दुरुस्तींची आवश्यकता
रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारींची गरज आहे. परंतु चोर्ला रस्त्याच्या बाबतीत गेल्या पाच-सहा वर्षांपासून गटारींची साफसफाई केली नसल्याने गटारी पालापाचोळा व दगड मातीने भरल्या आहेत. पावसाळ्यात गटारी साफ न केल्याने काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्याला लागूनच वाहत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी स्वच्छ करणे गरजेचे आहे.









