दोन वर्षांतील शंभर बळींची नोंद का नाही झाली? आरोग्य खात्याने गोमंतकीयांना उत्तर देण्याची गरज
प्रतिनिधी /पणजी
गेल्या 2 वर्षांत म्हणजे जुलै 2020 ते जून 2022 या काळात कोरोनाचे 100 बळी गेले असून त्याची नोंद आरोग्य खात्याने आता उशिरा केल्यामुळे एकूण बळींची संख्या 100 ने वाढून ती 3949 झाली आहे. यापूर्वी देखील आरोग्य खात्याने तीन-चार वेळा अशा प्रकारे जादा बळींची नोंद उशिरा केली होती. अशी नोंद उशिरा का व कशी होते? असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ज्यावेळी कोरोनामुळे बळी जातात त्याचवेळी या 100 बळींची नोंद का झाली नाही? याचे उत्तर आरोग्य खात्याने देण्याची गरज आहे.
दरम्यान गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी 80 नवे कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित 79 रुग्णांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. दिवसभरात 73 रुग्ण बरे झाले असून एकूण सक्रिय रुग्णसंख्या 669 पर्यंत खाली आली आहे.
आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
रविवारीपर्यंत एकूण बळींची संख्या 3849 होती. त्यात सोमवारी मागील दोन वर्षांतील 100 बळींची भर आता घालण्यात आल्यामुळे एका दिवसात सोमवारी एकूण बळींची संख्या 3949 झाल्याचे समोर आले आहे. गोव्यासारख्या लहान राज्यात एवढे बळी कोरोनामुळे जाणे हे तसे धक्कादायक असून आरोग्य खाते अचानक बळी वाढवून आणखी धक्के देत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळेच अशा प्रकारे उशिराने बळींची नोंद करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे.
आतापर्यंत मिळून एकूण 251458 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 246840 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग नव्याने होणारी लागण, बळी कमी झाले असले तरी तो गोव्यातून संपलेला नाही, याची प्रचिती येत आहे.