वृत्तसंस्था/ धर्मशाला
आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेत्या इंग्लंड संघातील प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्सला तंदुरुस्तीची समस्या भेडसावत आहे. या स्पर्धेतील झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. आता इंग्लंडचा पुढील सामना मंगळवारी बांगलादेश बरोबर धर्मशाला येथे होणार आहे. या सामन्यातही स्टोक्सच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बेन स्टोक्सला पाठ दुखापतीची समस्या अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. सोमवारी इंग्लंडच्या खेळाडुंनी येथे काही वेळ नेटमध्ये सराव केला. पण या सरावात स्टोक्सने आपला सहभाग दर्शविला नाही. त्यामुळे तो बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे खचितच इंग्लंडचा संघ नाराज झाला असला तरी आम्ही मागील पराभवाचा विचार न करताना पुढील सामन्यासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे बटलरने म्हटले आहे. इंग्लंडच्या तुलनेत भारतातील खेळपट्ट्या आणि वातावरण निश्चितच वेगळे असल्याने इंग्लंडला त्यांच्याशी जुळवून घेताना काही वेळ लागेल. पण इंग्लंडचा संघ निश्चितच समतोल असून आम्ही या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करुन जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करु, असे कर्णधार बटलरने ग्वाही दिली आहे.









