वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत कामगिरी करण्यासाठी हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दाखल झाला आहे. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंदाना हिला सरावाच्या सामन्यावेळी दुखापत झाल्याने ती कदाचित या स्पर्धेतील येत्या रविवारी होणाऱया पाकविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची शक्मयता पुसट असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सरावाच्या सामन्यात खेळताना 26 वषीय स्मृती मंदानाच्या उजव्या हाताच्या बोटाला ही दुखापत झाली होती. सदर दुखापत किरकोळ नसल्याचे समजते. मात्र, या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ती खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण स्पर्धेत ती सहभागी होईल किंवा नाही, याबाबत मात्र सध्या काही सांगता येत नाही. या दुखापतीमुळे बुधवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱया सरावाच्या सामन्यात मंदाना खेळू शकली नव्हती. आयसीसीच्या टी-20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, विंडीज आणि आयर्लंड या संघांचाही सहभाग राहील. सदर स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत.









