भटक्या कुत्र्यांचा फार मोठा प्रश्न आपल्या देशात आहे. कठोर कायदे करुन अशा कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केली जाते. काही प्रगत देशांमध्ये हा प्रश्न नाही. तथापि, तेथे पाळीव कुत्र्यांचे काही प्रश्न आहेत. अशी कुत्री सार्वजनिक स्थानी अस्वच्छता करतात. त्यामुळे लोकांना त्रास होतो. फिरवायला नेलेल्या कुत्र्याने सार्वजनिक स्थानी अस्वच्छता केल्यास ती घाण मालकाने साफ केली पाहिजे, असा नियम काही देशांमध्ये आहे.
सध्या इटली या देशातही अशा श्वान मालकांच्या विरोधात एक कठोर कायदा येऊ घातला आहे. इटलीतील एका मोठ्या शहराच्या स्थानिक प्रशासनाने तेथील राष्ट्रीय सरकारकडे अशा कायद्याचा प्रस्ताव पाठविला आहे. शहरात पाळीव कुत्रे घेऊन येणाऱ्या लोकांवर दुहेरी कर लावण्यात यावा, असे या शहराचे म्हणणे आहे. तशा प्रस्ताव इटलीच्या राष्ट्रीय विधिमंडळात सादर करण्यात आला असून तयो संमत होईल, अशी शक्यता आहे. 2026 पासून कराचे कार्यान्वयन होऊ शकते. या शहरात सर्व कुत्र्यांची डीएनए नोंदणी झाली पाहिजे, असा कायदा आहे. कुत्र्याने सार्वजनिक स्थानी विष्ठा केल्यास आणि त्याच्या मालकाने ती साफ न केल्यास या विष्ठेची तपासणी करुन डीएनएच्या साहाय्याने त्याच्या मालकाला ओळखले जाते. विष्ठेची तपासणी करुन आधी ती कोणत्या कुत्र्याची आहे, हे निश्चित केले जाते. एकदा का कुत्रा सापडला, की त्याचा मालकही हाती लागतो. मग मालकाला मोठा दंड केला जातो. हा नियम सर्व इटलीभर लागू केला जावा, असे या शहराच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा, की शिस्त कुत्र्यांना नव्हे, तर कुत्र्यांच्या मालकांना लावावी लागणार असून त्यासाठी या मोठ्या दंडाची तरतूद या प्रस्तावित कायद्यात केली जाईल, असे दिसून येते. हा कायदा संमत झाला, तर तो करणारा इटली हा जगाच्या पाठीवरचा पहिला देश होणार आहे.









