प्राणी पाळणे हे वाटते तितके सोपे नव्हे, अस अनुभव अनेकांना आहे. पाळीव प्राण्यांपैकी जी दूध देणारे प्राणी आहेत, ते वगळले तर इतरांचा माणसाला फारसा उपयोगही नसतो. तरी असे प्राणी पाळल्यास त्यांची निगा राखावी लागते. वेळप्रसंगी त्यांना डॉक्टरकडेही घेऊन जावे लागते. कित्येकदा त्यांचे मालक त्यांच्याशी असा दुर्व्यवहार करतात की या प्राण्यांची दयाही येते. सध्या अशा प्रकारचा एक व्हिडीओ प्रसारित होत आहे, ज्यात चक्क एका पाळीव उंटाला त्याचा मालक मोटरसायकलवर बसवून कोठेतरी नेत आहे. कुत्रा, मांजर किंवा पाळीव पोपट यांना असे वाहनांवर बसवून घेऊन जात असलेले आपण अनेकदा पाहतो. हे प्राणी किंवा पक्षी आकाराने लहान असल्याने तसे करणे शक्य होते आणि त्याचे फारसे आश्चर्य कोणाला वाटत नाही. पण माणसापेक्षा प्रचंड मोठा असलेल्या उंटाला असे दुचाकीवरुन ‘डबल सीट’ नेताना पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
मोटरसायकल चालविणाऱ्यांने प्रथम या उंटाचे पाय बांधले आणि नंतर त्याला बाईकवर ठेवल्याचे दिसून येत आहे. तथापि, अशा अवजड प्राण्याला घेऊन गर्दीच्या रस्त्यावर बाईक चालविणे जवळपास अशक्यच. पण या व्यक्तीने असे का केले, हे मात्र स्पष्ट होत नाही. कारण उंट स्वत:च्या पायाने कितीही लांब चालू शकतो. तो आजारी असला तरीही चालू शकतो. कदाचित या उंटाला जखम झाली असावी. त्यामुळे त्याला चालवत नेणे अशक्य झाले असावे. किंवा उंटाच्या चालीने चालण्याइतका वेळ मालकाला नसावा. त्यामुळे तो त्याला बाईकवरुन नेत असावा. अशा अनेक शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, हे दृष्य अनोखे आहे, हे निश्चित. त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.









