उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर घणाघात
प्रतिनिधी / मुंबई
शिवसेनेच्या वर्धापनदिनानमित्त आज दोन सोहळे होत असताना पारंपरिक वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे गटाकडून झालेल्या सोहळ्यात भाजप-शिंदे यांच्या डबल इंजिन सरकारवर टीकेचे प्रहार करत घणाघात केला. हे डबल इंजिन असले तरी ते केवळ वाफा सोडणारे आहे. त्यामुळे ते पुढे जातच नाही, अशी टीका करत या गद्दारांमुळे राज्याची प्रगती खुंटली असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणले.
सुरुवातीला उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या सत्तावन्न वर्षांपूर्वी जो उत्साह होता तोच उत्साह आजही कायम असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आहे. इकडे निष्ठावंतांची गर्दी झाली असताना तिकडे शहरातल्या एका कोपऱ्यात गारदी जमले आहेत. पेशवे काळात लढ्यामध्ये गोंधळ घालायला, वसुली करायला भाडोत्री ठेवायचे त्याला गारदी म्हणत. राजकारणात टीकाटिप्पणी नेहमीच होत असते. मला जे काही सांगायचे होते ते काल पदाधिकाऱ्यांच्या महाशिबिरात सांगितले. त्यामुळे आज माझ्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम ठेवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काल देवेंद्र फडणवीस यांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. कोविडची लस म्हणे मोदींनी शोधून काढली. मग बाकीचे संशोधक काय गवत उपटत बसले होते का? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिंग द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रुग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे. सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता तापली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसऱ्यांना दु:ख देण्याचा आनंद काही विकृतांना असतो. तशी या गद्दारांना दुस्रयांना छळण्याची विकृती आहे. या गद्दारांनी आणि त्यांना साथ देणाऱ्यांनी शिवसेनेला छळायची विकृती अवलंबली आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि हिदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली, असे गद्दार म्हणतात. पण तिकडे मणिपूर पेटलेला असताना आमचे पंतप्रधान चालले आहेत अमेरिकेला. काल तेच सांगितले तर हे गारदी म्हणाले, सूर्यावर थुंकू नका. कोण सूर्य? तुमचा सूर्य असेल तर तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.
नेहमी सांगतात की हे डबल इंजिन सरकार आहे. जर डबल इंजिन सरकार आहे तर ते पुढे का जात नाही? नुसते वाफा सोडत आहे. तिकडे भाजपवाले मारले जात आहेत, तरी ते तिकडे जात नाही. हे यांचे कडवट हिंदुत्व. काँग्रेसची राजवट होती तेव्हा आमची युती होती. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा इस्लाम खतरे मे है असे बोलायचे. आता भाजपवाले सत्तेत आहेत तर हिंदू खतरे मे है असे बोलतात याचा अर्थ काय?
तुम्ही सत्ता चालवायला नालायक ठरलाय. हिंदू आक्रोश करत आहेत. काश्मीरमध्ये अजूनही हिंदू मारले जात आहेत. देशाचे शत्रू संपवायचे सोडून तुम्ही राजकारणामध्ये शत्रू संपवत निघालेले आहात. ही मनकी बात नाही, तर मणिपूरकी बात आहे. आज हास्यजत्रा कार्यक्रम ठेवला, त्यावेळी संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांना चार विरंगुळ्याचे क्षण असावे म्हणून बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केले, असे उद्धव ठाकरे म्हणाले
सध्याच्या सत्तासंघर्षावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता कोर्टाचा निकाल लागला आहे. अध्यक्षांचे काय होईल हे संजय राऊत यांनी सांगितले आहे. कोर्टाचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे यांना ट्रॅव्हल्स कंपनी काढायला सोपे जाईल. गुजरातला गेल्यावर कुठे रहायचे? गुवाहाटीला कुठे रहायचे? दिल्लीत गेल्यावर मुजरा कसा करायचा? हा सर्व अनुभव गाठीशी आलेला आहे. इतका अनुभव आलेला आहे की, त्याच्या गाठी झालेल्या आहेत. गुजरातला गाठीशेव खात आहेत. रक्त सांडून, घाम गाळून शिवसैनिकांनी तुम्हाला उभ केले होते. आयत्या बिळावर तुम्ही नागोबा झालेला आहात. भाजपवाले तुम्हाला दूध पाजतील, पुंगी वाजवतील, टोपलीत घालतील आणि कुठे देतील सोडून, ते सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आणि शिंदे गटाला इशाराही दिला.
मी कधी हिम्मत हरलो नाहीच आणि हरणार पण नाही. अतिरेक्यांचे संकट असो की धमक्या असो हे सर्व मी सोसले आणि ही सर्व फौज उभी केली. जिकडे आव्हान आहे तिथे शिवसेना, जिथे शिवसेना आहे तिथे आव्हान हे असलेच पाहिजे. परंतु हे आव्हान आपल्याला संपवायचे आहे आणि हे शेवटचे असणार आहे. आपल्याला हा शत्रू संपवायचा आहे. मी शिवसैनिकांचा पुत्र आहे. बाळासाहेबांनी तुमच्या साथीने आव्हाने परतवली, तशीच तुमच्या साथीने मी सुद्धा आव्हाने परतवणार आहे. फक्त तुमची साथ हवी. त्यांनी आमचा पक्ष चोरला, निशाणी चोरली आता आमचा बाप चोरायला निघाले आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
इकडचे कोणी तिकडे गेले की ठाकरे धक्का बसला असे म्हणतात. पण धक्का कधीच नाही. कालसुध्दा काही गेले. पण काही फरक पडत नाही. जे भाडोत्री असतील त्यांनाही घेऊन जा. पण एवढी तसदी घेऊ नका, तुम्ही यादी द्या, तुम्हाला जे हवे तेवढे पाठवून देतो. शिवसेना प्रमुखांनी जे दिले ते अस्सल बियाणे दिले आहे. आमचे पीक जरी तुम्ही नेले कापून तरी शेती आमची आमच्याकडेच आहे. शेतातले तण आम्ही काढून टाकतो. तुम्ही जी मेहनत घेतली आहे ती आम्ही वाया जाऊ देणार नाही. आपण भक्कम आहोत त्यांच्या छाताडावरती आपण उभे राहून भगवा फडकवू, असे बोलून त्यांनी शिवसैनिकांचा उत्साह वाढविला.








