प्रतिनिधी/ बेळगाव
विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मंगळूर, बेंगळूर संघांनी विजेतेपद पटकाविले तर संत मीरा (बेळगावने) दुहेरी मुकुट पटकाविला.
माळमारुती येथील टर्फ मैदानावर प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या अंतिम सामन्यात आरव्हीके बेंगळूरने संत मीरा बेळगावचा 2-0 असा पराभव केला. माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा बेळगावने आरव्हीके बेंगळूरचा 1-0 असा निसटता पराभव केला तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने शारदा विद्यानिकेतन मंगळूरचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 19 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात शक्ती एज्युकेशन इंस्टिट्यूशन मंगळूरने शांतीनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूरचा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. आता मध्यप्रदेश येथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी वरील विजेते संघ पात्र ठरले आहे.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे जनकल्याणचे लक्ष्मण पवार, कृष्णा भट, ए. बी. शिंत्रे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, अस्मिता एंटरप्राइजेसचे संचालक राजेश लोहार, राकेश आजरेकर, सुनील पवार, सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, सी. आर. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी पंच विजय रेडेकर, कौशिक पाटील, योगेश सांवगावकर, यश पाटील यांनी काम पाहिले. तर शिवकुमार सुतार, बसवंत पाटील, मयुरी पिंगट, भारती बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.









