फुटबॉल-बास्केटबॉल स्पर्धेत लोयला गोवाचा पराभव
बेळगाव ; सेंट पॉल्स स्कूल आयोजित मॅगीस चषक 14 वर्षाखालील निमंत्रितांच्या जेजिट्स स्कूल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लोयला स्कूल पुणे संघाने लोयला मडगाव गोवा संघाचा टायब्रेकरमध्ये 4-2 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर बास्केटबॉल स्पर्धेत लोयला पुणे संघाने लोयला गोवा संघाचा 18-16 अशा फरकाने पराभव करून विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकाविले. सेंट पॉल्स स्कूलच्या अॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित मैत्रीपूर्ण जेजिट्स स्कूल फुटबॉल व बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी फादर सिमॉन फर्नांडीस, फादर डॉ. सॅविओ अॅब्रू, फादर सेबॅस्टन परेरा यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करून दोन्ही स्पर्धांना चालना देण्यात आली. फुटबॉल स्पर्धेत लोयला पुणे, लोयला मडगाव गोवा, सेंट विनसंट पुणे, सेंट ब्रिटो गोवा, सेंट झेवियर्स कोल्हापूर, सेंट पॉल्स बेळगाव या संघांदरम्यान साखळी पद्धतीची फुटबॉल
स्पर्धा घेण्यात आली. या साखळी स्पर्धेत लोयला गोवा, लोयला पुणे, ब्रिटो गोवा, व विनसंट पुणे संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लोयला पुणे संघाने सेंट ब्रिटो गोवाचा 2-0 असा पराभव केला. लोयला गोवा संघाने सेंट विनसंट पुणे संघाचा 1-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात लोयला पुणे व लोयला गोवा संघांनी दोन्ही सत्रात गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. निर्धारित वेळेत गोल न झाल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये लोयला पुणे संघाने 4-2 असा विजय मिळवित मॅगीस चषकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिषेक चेरेकर, मंथन गावकर, समर्थ बांदेकर व रॉयस्टीम जेम्स यांनी काम पाहिले. बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लोयला पुणे संघाने लोयला गोवा संघाचा 18-16 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या लोयला पुणे, लोयला गोवा संघांना चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेंट पॉल्सचे क्रीडा शिक्षक अँथोनी डिसोझा, बालेश येंड्रोनी, आशिका सरकार व सेंट पॉल्सच्या शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेवेळी लोटस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले.









