प्राथमिक विभागीय फुटबॉल स्पर्धा, तालुका स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : प्राथमिक वंटमुरी विभागीय फुटबॉल स्पर्धा भुतरामट्टी येथील भगवान महावीर जैन शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या. मुला-मुलींच्या दोन्ही गटाचे विजेतेपद महावीर जैन शाळेने पटकावून दुहेरी मुकूट संपादन केला. मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात जैन महावीर शाळेने विजया इंटरनॅशनल शालेय संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जैन महावीर शाळेतर्फे मलगौडा बी. पाटील याने 2 गोल नोंदविले. त्यानंतर खेळविण्यात आलेला अंतिम सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. ट्रायब्रेकरवर जैन महावीर शालेय संघाने गतविजेत्या सेंट जॉन्स स्कूल काकती संघाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. जैन महावीर संघाचा गोलरक्षक भुषन कुरबर याने शेवटच्या क्षणी गोलरक्षण करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करून वाहव्वा मिळविली. मुलींच्या गटात जैन महावीर संघाने सरकारी स्कूल बी. के. कंग्राळी संघाचा 2-0 अशा गोल फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रारंभी प्रमुख पाहुण्या निशा राजेंद्रन यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अल्लाबक्ष बेपारी, रमेश कांबळे, प्रकाश पुजेरी, प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. वरील दोन्हीही विजयी संघ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघातील खेळाडूंना प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनिल देसाई यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य निशा राजेंद्रन व चेअरमन सुधर्म मुडलगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









