आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार : मिचेल मार्शकडे कर्णधारपदाची धुरा
वृत्तसंस्था/ सिडनी
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. दोन अव्वल खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क दुखापतीमुळे या द्रौयातून बाहेर पडले आहेत. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत ते पूर्णपणे तंदुरुस्त होतील, अशी आशा असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
नियमित कर्णधार पॅट कमिन्स देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे मिचेल मार्श आता वनडे आणि टी-20 मालिकेत संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तर स्टार्कच्या अनुपस्थितीत अनकॅप्ड डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन टी-20 नंतर वनडे संघाचाही भाग असेल. याचबरोबर स्मिथच्या जागी मार्नस लाबुशेनचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. टी-20 संघात स्मिथच्या जागी अॅश्टर टर्नर सहभागी होईल. दरम्यान, स्मिथला डाव्या हाताच्या मनगटात दुखापत झाली असून त्यामुळे तो पुढील चार आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. तर स्टार्क इंग्लंडहून परतल्यापासून ‘कंबरदुखी‘ने त्रस्त आहे.
स्टीव्ह स्मिथ व मिचेल स्टार्क यांनी आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी दिली. स्मिथ आणि स्टार्क भारताविरुद्ध मालिकेतून पुनरागमन करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 व वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. 30 ऑगस्टपासून उभय संघातील टी-20 मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये वनडे व टी-20 मालिकेचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ – मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ऍरॉन हार्डी, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हॅझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टोनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.









