वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
आगामी होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 9 ते 19 एप्रिल दरम्यान पाकमध्ये होणाऱ्या पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी विंडीज महिला संघाची घोषणा करण्यात आली. मात्र अनुभवी अष्टपैलु डॉटीनला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे.
अलिकडेच भारतात झालेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत खेळताना डॉटीनला स्नायु दुखापत झाली होती. मात्र ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार 2025 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र फेरीची स्पर्धा पाकमध्ये 9 ते 19 एप्रिल दरम्यान होणार असून या स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश आहे. गेल्यावर्षी झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीजतर्फे 33 वर्षीय डॉटीनने पाच सामन्यातून सर्वाधिक म्हणजे 120 धावा जमविल्या. पाकमधील होणाऱ्या आगामी पात्रतेच्या स्पर्धेकरिता विंडीज संघाचे नेतृत्व हिली मॅथ्युजकडे सोपविण्यात आले आहे.
2022-25 दरम्यान आयसीसीच्या महिलांच्या वनडे चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 10 संघांचा समावेश होता आणि विंडीजला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पाकमध्ये आगामी होणाऱ्या पात्रफेरी स्पर्धेत विंडीजला बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, थायलंड आणि पाक विरुद्ध सामने खेळावे लागतील. 2025 च्या उत्तराधार्थ भारतात होणाऱ्या आयसीसीच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, लंका, न्यूझीलंड आणि यजमान भारत हे या पूर्वीच पात्र ठरले आहे.
विंडीज संघ: हिली मॅथ्युज (कर्णधार), एस. कॅम्पबेल, अलिया अॅलेनी, फ्लेचर, चेरी अॅन फ्रेझर, शबीका गजनबी, जेनीला ग्लॅस्गो, चिनेली हेन्री, झायदा जेम्स, जोसेफ, मॅन्डी मंग्रु, अश्मिनी मुनीसार, करिश्मा रामहॅरेक, स्टिफेनी टेलर आणि रशिदा विलियम्स









