व्हेनेझुएलातील माराकाइबा या शहरात एकेकाळी चोर महिलांच्या डोक्यावरील केस कापून नेत होते. कात्री हातात पकडून चोर लपून रहायचे आणि संधी मिळताच महिलांच्या डोक्यावरील केस कापून पळून जायचे. तेव्हा या चोरांना पिरान्हा या नावाने ओळखले जात होते. हे लोक स्वत:सोबत बंदूक देखील बाळगत होते. प्रामुख्योन सागर किनाऱ्यानजीक त्यांना पाहिले जात होते. अखेर हे चोर या केसांचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाजिक आहे. हे चोर हे केस हेअर सलून्समध्ये विकायचे आणि 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई करत होते. कोलंबिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतही केसचोरीच्या घटना घडल्या होत्या.
पुन्हा एकदा व्हेनेझुएलामध्ये केसांना मोठी मागणी, परंतु यावेळी उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. यावेळी प्रसिद्ध माराकाइबो सरोवर वाचविण्यासाठी लोक स्वत:चे केस कापून दान करत आहेत. माराकाइबो सरोवर दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात जुन्या सरोवरांपैकी एक आहे. परंतु येथे कच्च्या तेलाच्या विहिरी असून त्यातून तेल काढले जाते. सातत्योन कच्च्या तेलाच्या विहिरींमध्ये उत्खनन सुरू असल्याने हा भाग अत्यंत प्रदूषित ठरला आहे. पूर्ण सरोवर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. सरोवराच्या पाण्यावर तेलाचे कण फैलावलेले असून ते जीवांसाठी जीवघेणे ठरत आहेत. तेलाच्या या कणांचा फैलाव रोखण्यासाठी आणि त्यांना पाण्यापासून वेगळे करण्यासाठी विशेष प्रकारची चटई तयार केली जात असून ती मानवी केसांद्वारे निर्माण करण्यात आली आहे. याचमुळे केस दान करण्याची मोहीम सध्या सुरु आहे.
इंद्रधनुष्यी चमक आणि हिरव्या शैवालीय फुलांने झाकलेल्या या सरोवराला वाचविण्याची मोहीम 28 वर्षीय सेलीन एस्ट्राचने स्वत:च्या हातात घेतली आहे. सेलीनने माराकाइबो सरोवराला साफ करण्याचा विडा उचलला आहे. तिने प्रोएक्टो सिरेना नावाची एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून ती आता पूर्ण देशात फैलावलेली आहे. ही संस्था लोकांना स्वत:चे केस दान करण्याचे आवाहन करत आहे. सेलीनच्या मोहिमेच्या प्रभावामुळे महिला, मुले आणि युवा देखील स्वत:चे केस कापून घेत ते दान करत आहेत. अनेक लोकांनी स्वत:च्या श्वानांचे केस कापूनही दान केले आहेत.
तेलाला शोषून घेतात केस
सेलीनची टीम दान करण्यात आलेल्या केसांचा वापर पेंटीहोजसारखे जाळे विणण्यासाठी करत आहेत. याच्या माध्यमातून माराकाइबो सरोवरातील फैलावलेले तेल शोषून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरोवराच्या सफाईसाठी चटईसारखे उपकरण डिझाइन करण्यात आले आहे. याचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे. 2 पाउंड केस 11 ते 17 पाउंड तेल शोषून घेऊ शकतात. ही पर्यावरण रक्षणाची अनोखी पद्धत असल्याचे सेलीनचे सांगणे आहे.









