जागृतीचा अभाव,गैरसमज आणि अंधश्रद्धेमुळे सापांची हत्या
प्रतिनिधी/ बेळगाव
नागपंचमीदिवशी नाग व वारुळाची पूजा केली जाते. मात्र केवळ पूजा करून चालणार नाही तर सापांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गैरसमज आणि अंधश्रद्धेपोटी दिवसेंदिवस सापांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत सापांचे संवर्धन आवश्यक आहे. नागपंचमीनिमित्त बेळगाव परिसरात आढळून येणाऱ्या सापांविषयी घेतलेला आढावा…
बेळगाव परिसरात तब्बल 35 हून अधिक जातींचे साप आढळून येत असले तरी त्यामध्ये विशेषत: नाग, धामण, घोणस, मण्यार जातींच्या सापांचा वावर अधिक आहे. याबरोबर अजगर आणि गवत्या जातींचे सापही अलिकडे निदर्शनास येऊ लागले आहे. वनक्षेत्र, डोंगर परिसर आणि शिवारातदेखील सापांची संख्या अधिक आहे. मात्र सापांविषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धेपोटी संख्या घटताना दिसत आहे. अलिकडे सर्प मित्रांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सापांचे संवर्धन होऊ लागले आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागात सापाला जीवंत मारण्यातच धन्यता मानली जाते. शिवाय वनखात्याकडून सापांच्या संवर्धनासाठी जागृती होत नसल्याची खतंदेखील सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.
सापांचे महत्त्व लक्षात घेऊन वनविभागाने व्यापक मोहिम राबविणे गरजेचे आहे. तसेच सर्प मित्रांसाठी विविध प्रशिक्षण राबविण्याची गरजदेखील आहे. सापांच्या असलेल्या विविध जाती त्यातील विषारी कोणत्या? बिन विषारी कोणत्या? महत्त्व आणि सर्पदंशानंतर करण्यात येणारे प्रथमोपचार याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. यासाठी वनखात्याने अधिक सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मत सर्पप्रेमींतून व्यक्त होत आहे.
सापांमध्ये सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा अजगरदेखील दोन वर्षापूर्वी शहरात आढळून आला होता. 2019 ला झालेल्या अतिवृष्टीमुळे अजगर नाल्यातून आला होता. त्यामुळे अशा दुर्मिळ सापाचे दर्शनदेखील शहरवासियांना झाले होते.
शिवरुद्रप्पा कबाडगी (एसीएफ वनखाते)
बेळगाव परिसरातदेखील विषारी आणि बिनविषारी साप आढळून येतात. अलिकडे सापांची हत्या कमी झाली आहे. विविध स्तरावर सापांविषयी जनजागृती केली जात आहे. खात्यामार्फतही यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे सापांची संख्या वाढू लागली आहे.
सदाशिव पाटील, (सर्पमित्र)
केवळ नागपंचमीदिवशी नागाची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी साप दिसतात त्याची हत्या केली जाते. जोपर्यंत सापांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. तोपर्यंत साप आणि मानव यातील दरी कमी होणार नाही. अंधश्रद्धा गैरसमज आदी प्रकारामुळे सापांना मारले जात आहे. याबाबत वनखात्यांनी जनजागृती केली पाहिजे.
ढोलगरवाडीत केवळ चित्रप्रदर्शन
नागपंचमीनिमित्त सोमवार दि. 21 रोजी ढोलगरवाडी येथे सापांची प्रत्यक्ष दर्शन दिले जाणार आहे. केवळ चित्र प्रदर्शन आणि सापांविषयी माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती संदीप टक्केकर यांनी दिली आहे.
चंदगड तालुक्यात सर्पदंशावर उपचार
चंदगड तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावर उपचार केले जात आहे. कानूर खुर्द, हेरे, तुडये, माणगाव, अडकूर, कोवाड आदी ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. नितीन देसाई यांनी दिली आहे.









