अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेंद्र सरकारच्या अजेंड्यावर ते बोलले. ह्या अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प पुढील पाच वर्षांची दिशा ठरवेल आणि 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घालेल, असे ते म्हणाले. तसेच
जूनमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळावरही मोदींनी टीका केली. संसद ही पक्षासाठी नाही, तर देशासाठी आहे. पहिल्या अधिवेशनात 140 कोटी देशवासियांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा आवाज दाबण्याचा अलोकतांत्रिक प्रयत्न झाला, असे ते म्हणाले. विरोधकांनी आपले अपयश लपवण्यासाठी संसदेच्या वेळ वाया घालवला. देशाच्या पंतप्रधानांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. अडीच तास माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाही परंपरांमध्ये अशा वर्तनाला स्थान असू शकत नाही, असेही पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले.
पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी एक महत्त्वाचे सत्र सुरू होत आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेचे हे अधिवेशन सकारात्मक, सर्जनशील आणि देशवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भक्कम पाया घालणारे असावे, याकडे देश बारकाईने पाहत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा संदर्भ देत गेल्या सत्रात अनेकांना आपल्या क्षेत्राबद्दल बोलण्याची संधी मिळाली नाही. कारण काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणाने आपले अपयश झाकण्यासाठी देशाच्या संसदेच्या महत्त्वाच्या वेळेचा गैरवापर केला. मात्र, ह्या अधिवेशनात वेळ वाया न घालवता देशहिताचा विचार करून सकारात्मक पावले टाका, असेही ते म्हणाले.
खासदारांना आवाहन
मी देशातील सर्व खासदारांना सांगू इच्छितो, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, जानेवारीपासून आत्तापर्यंत आमच्यात जितकी ताकद होती तितकीच आम्ही लढलो आहोत. कुणी जनतेला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण आता ते युग संपले आहे. जनतेने आपला निकाल दिला आहे. आता पक्षाच्या पलीकडे जा आणि देशासाठी स्वत:ला समर्पित करा आणि पुढील साडेचार वर्षांसाठी संसदेच्या या सन्माननीय व्यासपीठाचा वापर करा. 2029 च्या निवडणूक वर्षात तुम्ही कोणतेही ‘राजकारण’ करा, पण तोपर्यंत शेतकरी, तऊण आणि देशाच्या सक्षमीकरणासाठी आपण आपली भूमिका बजावली पाहिजे, असे परखड आवाहन पंतप्रधानांनी केले.









