वीज दरवाढीला विरोधकांचा प्रखर आक्षेप
प्रतिनिधी/ पणजी
केवळ काही मिनिटांच्या कार्यक्रमावर कोट्यावधी ऊपये खर्च करण्याची क्षमता असलेल्या सरकारकडे वीज दरवाढीचा भार सहन करण्याची ताकद नाही का? असा सवाल उपस्थित करत सवर्सामान्य नागरिकांसह प्रमुख राजकीय विरोधी नेत्यांनीही प्रस्तावित वीज दरवाढीला जोरदार विरोध केला.
येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यात वीज दरात वाढ होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर संयुक्त वीज नियामक आयोगाने काल बुधवारी पणजीत मिनेझीस ब्रागांझा सभागृहात जनसुनावणी आयोजित केली होती. श्रीमती ज्योती प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जनसुनावणीवेळी काँगेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाचे नेते, विविध संस्था, औद्योगिक कंपन्या आदींचे प्रतिनिधी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांचीही उपस्थिती होती.









