कोल्हापूर / इम्रान गवंडी :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयातील (सीपीआर) कोट्यावधी रूपयांच्या निधीतुन सर्वच विभागांचे नुतनिकरण व आधुनिकीकरण सुरू आहे. याअंतर्गत सीपीआरचे रूपडे पालटत आहे. मात्र, सीपीआरमधील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, वैद्यकीय असुविधा, औषधांची कमतरता, डॉक्टर वेळेत हजर नसणे, वारंवार बंद पडणारे सोनोग्राफी व एक्सरे मशिन, एजंटांचा सुळसुळाट, बाहेरून कराव्या लागणाऱ्या तपासण्या आदी प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. त्यामुळे केवळ चकाकी नको… अतंर्गत यंत्रणाही सक्षम करा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यासह परराज्यातील गरीब व गरजूंना आधारवड ठरेलल्या व थोरला दवाखाना म्हणून नावलौकीक असणाऱ्या सीपीआरचे रूपडे पालटत असले तरी उपचारातील आरोग्य यंत्रणेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते नुतनिकरण झालेल्या 12 विभागांचे दिमाखात लोकार्पण झाले. मात्र, सीपीआरमधील सतत भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील महिन्यात खासगी लॅब प्रतिनिधीकडून रूग्णांची होणारी लुट, तपासणीसाठी सीपीआरमधील डॉक्टर व लॅब प्रतिनिधींचे असणारे लागेबांधे एका संघटनेने उघडकीस आणले होते. याला एक महिन्याचा कालावधी लोटला असुन अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधल्याचे सोंग करत आहे. काही दिवसापूर्वी तर चक्क अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करून सीपीआरमध्ये नोकरीचे बनावट प्रमाण देण्यापर्यंत फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
मागील आठवड्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे सीपीआरमध्ये अचानक पाहणी करण्यास आले असता. त्यावेळी एका रूग्णांने डिस्जार्चसाठी डॉक्टरांनी दिवसभर थांबवून घेतल्याचे गाऱ्हाणेच आरोग्य मंत्र्यांसमोर मांडले. केवळ कागदोपत्री गोंधळामुळे रूग्णाला दिवसभर ताटकळत बसावे लागले असल्याचे सांगितले. या रूग्णाला इतर त्रास असल्याने 24 तास देखरेखीत ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे डिस्जार्च दिला नाही, असे अधिष्ठातांनी स्पष्ट केले.
सीपीआरमधल बहुतांश डॉक्टर प्रामाणिपणे रूग्णसेवा बजावतात. मात्र, सीपीआरच्या काही ओपीडीमधील ठरावीक डॉक्टर रूग्ण तपासणीसाठी वेळेत हजर राहत नसल्याच्या कायम तक्रारी केल्या जातात. काहीवेळा हजेरी लावून डॉक्टर आपल्या खासगी ओपीडीकडे जातात. त्यामुळे सीपीआरमध्ये कमी तर स्वत:च्या खासगी दवाखान्यात जादा वेळ देत असल्याचेही अनेकवेळा बोलले जाते. अशा बऱ्याच डॉक्टरांबद्दल तक्रारी आहेत.
- भौतिक सुविधांसह रूग्णसेवाही महत्वाची
नुतनिकरणामुळे सीपीआरचे रूपडे पालटणार आहे. यासाठी तत्कालिन पालकमंत्री मुश्रीफ यांनी 46 कोटींचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला. यातून प्रत्येक विभागाचे नुतनिकरण होत आहे. ही बाब चांगली असली तरी भौतिक सुविधांसह रूग्णसेवेतही कसूर राहू नये व गैर प्रकार होऊ नयेत याची दखल घेणेही गरजेचे आहे.
- दोन्ही मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
वैद्यकीय शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्री ही दोन्ही पदे कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सदृढ होण्यास चालना मिळेल. यामुळे सीपीआरची वैद्यकीय सेवा सक्षमिकरणास गती मिळेल. मात्र, सीपीआरमधील होणारे गैरप्रकार, उपचारात हलगर्जीपणा, अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, आदी प्रकार रोखण्याठी दोन्ही मंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
एकूण इमारती : 18
एकूण वॉर्ड : 36
लोकार्पण झालेले विभाग : 12
रोज येणारे रूग्ण : 1 हजार ते 1500
रोज दाखल होणारे रूग्ण : 200 ते 250
एकूण बेडची संख्या : 800
- दर्जेदार सुविधा देण्यावर भर
सीपीआरमध्य झालेल्या औषध घोटाळ्यांचे तपास प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. औषधांचा मुबलक साठा आहे. खासगी लॅबचे प्रतिनिधीं आढळल्यास संबंधित डॉक्टर व लॅब प्रतिनिधींवर जागीच कारवाई करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. कोणताही गैरकारभार, भ्रष्टाचार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असुन रूग्णांना दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








