पुणे / प्रतिनिधी :
भाजप आणि आरएसएसचे सरकार 2024 मध्ये येऊ देऊ नका तसेच आपण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
आंबेडकर म्हणाले, सत्ता टिकवण्यासाठी भाजपने एक कोणती चांगली गोष्ट केली आहे, ते सांगावे. भाजपात मोदींनंतर दुसरा पंतप्रधान कोण आहे? एकही माणूस आपल्या नजरेसमोर नाही, जो देशाचे नेतृत्त्व करु शकतो. काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीत, दक्षिणेतील आणि उत्तर भारतातील राज्यातही हीच परिस्थिती आहे. ईडी, सीबीआय, आयबीचा लोकांना धाक आहे, म्हणून सगळे लोक त्यांना मुजरा करतात, हाथ जोडतात, हे वास्तव आहे.
सत्ता जाण्याची भीती
तुम्ही मोदींना दोनदा पंतप्रधान केले. पण आता मोदींच्या मनात भीती आहे की, 2004 मध्ये त्यांचे चारित्र्य लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांच्याकडून बीबीसीचा माहितीपट दाखवणाऱ्यांना अटक केली जात आहे. ही फिल्म दाखवली तर आपली सत्ता जाईल, याची त्यांना भीती आहे. म्हणून ती बॅन करण्यात आली आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.