पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना : महामंडळांसोबत प्रशासनाची संयुक्त बैठक : एकखिडकी सुविधा
बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, हेस्कॉम या सर्वांनीच पूर्व तयारी पूर्ण केली आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी आयोजित बैठकीत दिली. गणेशोत्सवासाठी सोमवारी महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये शहरातील महामंडळ, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, हेस्कॉम तसेच विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. गणेशोत्सव महामंडळांनी विद्युत बिलामध्ये सवलत देण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत आपण चर्चा करु, असे आश्वासन त्यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांनीही वेळेत मिरवणूक सुरू करुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुरुषांसह महिलांचीही गर्दी होते. त्यामुळे महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात गर्दी होते. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विसर्जन तलावांची स्वच्छता करण्याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. तसेच विसर्जन मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या दुरुस्त कराव्यात, अशा सूचना हेस्कॉमला करण्यात आल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी 1 कोटी रुपये निधी राखीव ठेवल्याचे सांगितले. या निधीतून रस्ते तसेच इतर कामे केली जाणार आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथे विसर्जनादिवशी गॅलरी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी विसर्जन तलावांच्या व्यवस्थेविषयीची माहिती दिली.
मंगाई तलावात विसर्जनाची व्यवस्था करा
नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावात माती भरल्याने हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून मंगाई तलावामध्ये विसर्जनाची व्यवस्था करावी, अशी मागणी शहापूर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केली. शहापूरमधील विद्युत वाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी सागर पाटील यांनी केली. विसर्जनादिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये दोन बेस दोन टॉप साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी, अशी मागणी रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. यावेळी आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस आयुक्त सिध्दरामप्पा, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. सुनील जाधव, विजय जाधव, मल्लेश चौगुले यांनी महामंडळाच्यावतीने विविध मागण्या केल्या. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.









