मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करावेत. ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम पथकांनी एकाच ठिकाणी उशिरापर्यंत वादन न करता 15 ते 20 मिनिटे वादन केल्यास शिवभक्तांना चित्ररथ पाहताना अडचणी येणार नाहीत. त्याचबरोबर चित्ररथ लवकर मार्गस्थ करावेत, अशा विविध विषयांवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. रविवारी सायंकाळी नाथ पै सर्कल येथील श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव होते. सुरुवातीला त्यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश पटवून दिला.
परंपरेनुसार 29 एप्रिल रोजी शिवजयंती असून 1 मे रोजी शहापूर भागातील चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. चित्ररथ मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरील आधारित देखावे सादर करावेत. डॉल्बीला फाटा देत शिवचरित्र कसे सादर करता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे. शहापूर परिसरात चित्ररथांची संख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे अलीकडेच हलगा गावातील तिघांच्या कानाला इजा पोहोचली आहे. लेझर व शार्पीमुळे डोळ्यांवर परिणाम होत असून त्याचादेखील वापर टाळावा. महाराजांचे शौर्य भावी पिढीला समजले पाहिजे. बेळगावातील शिवजयंती महाराष्ट्रापेक्षा भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी केली जाते. शिवजयंती पाहण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्रातील शिवभक्त येत असतात. शहरातील झांजपथकांसाठी एखादी स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आहे. चित्ररथांपुढे 15 ते 20 मिनिटे वादन झाले पाहिजे. त्याचबरोबर चित्ररथ शिवजयंती मंडळांनी लवकर बाहेर काढावेत.
चित्ररथावरील पात्रांसाठी आवश्यक असलेले रंग व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. स्पिकर लावताना बेसचा वापर करू नये. त्यामुळे बोललेला आवाज व संभाषण स्पष्ट ऐकू येतो. डॉल्बीच्या आवाजावर पोलिसांनी मर्यादा आणावी. नाथ पै सर्कल येथे घालण्यात येणारा मंडप छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाकडे घालण्यात यावा. त्यामुळे बेळगावच्या मुख्य चित्ररथ मिरवणुकीत सामील होण्यास अडचण येणार नाही. कोरे गल्ली शहापूर येथे गेल्या दोन वर्षांपासून चित्ररथ मिरवणूक काढण्यात येत नव्हती. मात्र यंदा चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पण चित्ररथ बेळगावातील मुख्य मिरवणुकीत नेण्यात येणार नाही. शहापूर परिसरातच चित्ररथ फिरविण्यात येईल. शहापूर परिसरात 10 चित्ररथ असून प्रत्येक चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा. शहापुरातून किमान 20 चित्ररथ निघावेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शिवजयंती मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर डॉल्बीमुळे गर्दी होत असून चेंगराचेंगरीही होत आहे. कर्णकर्कश आवाजाऐवजी सुमधूर आवाज कानावर पडावा यासाठी मंडळांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे चित्ररथ मिरवणुकीला गालबोट न लागता शांततेत व उत्साहात चित्ररथ पार पाडावेत, त्याचबरोबर शिवजयंती दिवशी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले. महापौरांना आमंत्रण देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला माजी नगरसेवक संजय शिंदे, रणजित हावळाणाचे, अशोक चिंडक, श्रीकांत प्रभू, हिरालाल चव्हाण, प्रकाश हेब्बाजी, शिवाजी हावळाणाचे, रोहित भातकांडे, अभिजीत मजुकर, रविंद्र शिगेहळ्ळीकर यांच्यासह विविध शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









