तैवान-चीनी समुद्र प्रश्नी अमेरिकेला चीनचा इशारा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
तैवान किंवा दक्षिण चीनी समुद्राच्या मुद्द्यांवरुन आम्हाला दाबण्याचा, आमची कोंडी करण्याचा किंवा आमच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीटर हॅगसेथ यांच्यात व्हिडीओ कॉल वरुन या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा झाली. या चर्चेत हा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे.
अमेरिकेची संरक्षण संस्था पँटॅगॉनच्या माध्यमातून ही चर्चा झाली. तैवान हा स्वतंत्र द्वीपदेश असल्याचे प्रतिपादन करत आहे. तथापि, चीन या बेटाला आपला भाग मानत आहे. तसेच तैवानला आधीन करुन घेण्यासाठी सेनाबळाचा उपयोग करणार नाही, असे आश्वासन चीनने दिलेले नाही. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता गृहित धरावी लागते. अशा स्थितीत दोन्ही देशांमध्ये झालेली ही चर्चा सकारात्मक आणि स्पष्ट होती, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
अमेरिका आणि चीनचा वाद
तैवानप्रमाणेच दक्षिण चीनी सागराच्या नियंत्रणावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात बऱ्याच काळापासून वाद आहे. या सागरात कृत्रिम बेटे निर्माण करुन चीनने या समुद्रावर आपला अधिकार नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, अमेरिकेने तैवानच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व स्वीकारलेले असून दक्षिण चीन सागरावरच्या चीनच्या वर्चस्वाला अमेरिकेने क्वाडच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. यामुळे या दोन विषयांच्या संदर्भात नेहमी या दोन देशांमध्ये वाद होत आहे.
चर्चा सकारात्मक
अमेरिका आणि चीन यांच्यातील मंगळवारी झालेली चर्चा सकारात्मक होती, अशी माहीती पँटॅगॉनच्या वतीने देण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चेची माहिती ती झाल्यानंतर वृत्तपत्रांना दिली. दोन्ही देशांचा एकमेकांसंबंधीचा दृष्टीकोन पूर्वीप्रमाणेच असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे तैवानसाठी दोन्ही देशांना कधीनाकधी एकमेकांसमोर यावे लागणार, ही बाबही या चर्चेतून उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.









