बेळगावात आत्महत्यांच्या घटनांचा वाढता आलेख : प्रौढांबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांमुळे समाजमनात चिंतेचे वातावरण
बेळगाव : आत्महत्या करणे महापाप आहे, असे महात्मा गांधीजींनी सांगितले आहे. आत्महत्या कायद्यानेही गुन्हा आहे. तरीही आत्महत्येचे प्रकार घडतच असतात. बेळगाव शहर व उपनगरात गेल्या तीन वर्षात 1 हजार 182 जणांचे अकाली मृत्यू झाले असून, यापैकी 614 जणांनी आत्महत्या केली आहे. तीन वर्षाची आकडेवारी लक्षात घेता नागरी समाजाची चिंता वाढविणारी ही आकडेवारी आहे. पोलीस दलाकडून उपलब्ध माहितीनुसार 2021 मध्ये 373, 2022 मध्ये 405 तर 2023 मध्ये 404 जणांच्या अकाली मृत्यूची नोंद आहे. 2022 आणि 2023 मधील आकडेवारी लक्षात घेता गेल्या वर्षी केवळ एका आकड्याचा फरक आहे. तीन वर्षात एकूण 1182 जणांचे वेगवेगळ्या कारणांनी आकस्मिक मृत्यू घडले आहेत.
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतची आकडेवारी लक्षात घेता तिघा जणांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. तर विहीर, तलावात उडी टाकून 5 जणांनी आपले जीवन संपविले आहे. सर्वाधिक 164 जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. तर 35 जणांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. औषधी गोळ्यांचे अतिसेवन करून एकाने आपले जीवन संपविले आहे. गेल्या वर्षी बेळगावात सव्वा दोनशेहून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येची कारणे अनेक आहेत. कर्जबाजारीपणा, आजार, कौटुंबीक अडचणी, व्यसनाधीनता, मानसिक अस्वास्थ्य, व्यापारातील नुकसान, मानसिक गुंतागूंत अशा अनेक कारणांनी लोक आत्महत्या करतात. काही जण आपल्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत? त्यांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवून जीवन संपवतात. तर काहींचे नेमके कारण काय आहे? याचा उलगडा होत नाही.
आर्थिक विवंचनेमुळे अनेक विणकरांची आत्महत्या
कोरोनोत्तर काळात आर्थिक विवंचनेमुळे बेळगाव परिसरातील अनेक विणकरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. विद्यार्थीही यामध्ये मागे नाहीत. गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी महाद्वार रोड येथील अमित अजित देसाई (वय 15) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच शनिवार दि. 27 जानेवारी रोजी भाग्यनगर दुसरा क्रॉस, अनगोळ येथील साक्षी संदीप चौगुले (वय 15) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाने पालक, तपास अधिकारी व समाजाची चिंता वाढली आहे. शिक्षण घेण्याच्या वयात विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार का डोकावतो आहे? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शाळा-कॉलेजच्या परिसरात सुरू असलेला अंमलीपदार्थांचा व्यापार, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना होणारी दमदाटी, धमकावण्याचे प्रकार, काही वेळा अभ्यासाचा ताण आदी कारणांमुळेही अशा घटना घडत असल्याचा संशय आहे.
केवळ दहा दिवसात दोघा विद्यार्थ्यांनी जीवन संपवले
केवळ दहा दिवसात दोघा विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोनपैकी एका प्रकरणातही त्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, याचा उलगडा झाला नाही. जेव्हा वयस्कर आत्महत्या करतात, त्यावेळी कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी, प्रेमवैफल्य, कौटुंबीक अडचणी आदी कारणे सांगितली जातात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का वाढल्या किंवा का सुरू आहेत, याची नेमकी कारणे काय आहेत? याचा शोध घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आत्महत्येचा एखादा प्रकार घडल्यानंतर जर कारण माहीत नसेल तर पोटदुखीला कंटाळून किंवा व्यसनाधीनतेमुळे त्याने आत्महत्या केली आहे, असे सांगत प्रकरणावरच पडदा टाकला जातो. कुटुंबीयांबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनाही प्रकरण संपविण्याची घाई असते. त्यामुळे अनेक प्रकरणात त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होत नाहीत. एखाद्या व्यक्तीने जर अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान आत्महत्या केली तर त्याला ‘बाधा’ झाली होती म्हणून अमावस्या-पौर्णिमेला त्याच्या अंगात संचार व्हायचा, भूतबाधेमुळे त्याने आत्महत्या केली आहे, अशी नोंद करून प्रकरण संपविल्याचीही उदाहरणे आहेत. गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीच्या सुरुवातीलाही आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. यावर गांभीर्याने विचार करून सामूहिक समुपदेशनाची गरज व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दबाव टाळणे गरजेचे
आत्महत्येला सामाजिक, मानसिक कारणे असतात. परीक्षेची वेळ जवळ आली की पास होणार की नाही? या भीतीने विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचा विचार सुरू होतो. निकालाच्या वेळीही अशीच मनस्थिती असते. भीतीदायक मानसिकतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते. आत्महत्या टाळण्यासाठी प्रत्येकानेच आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. खासकरून विद्यार्थ्यांची आत्महत्या चिंता वाढविणारी आहे. पालक व शिक्षकांनी त्यांच्यावर सतत नजर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक बदल दिसून आल्यास तज्ञांकडून समुपदेशन व औषधोपचार केल्यास आत्महत्या टाळता येते. एकाकीपणा, निद्रानाश अशी अनेक कारणे यामागे असतात. विद्यार्थ्यांवर दबाव टाकणेही काही वेळा धोक्याचे ठरते. त्यामुळे त्यांच्यातील मानसिक बदल ओळखून त्यांना सावरण्याची गरज आहे.
– डॉ. चंद्रशेखर (मानसोपचार तज्ञ)









