ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर बलवान संघ उपांत्य फेरीत पोहोचतील अशीच अपेक्षा होती. ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरली नाही. भारत-न्यूझीलंड संघाने अगदी दिमाखदारपणे प्रवेश केला. परंतु पाकिस्तानने स्वत:च्या पायावर दगड मारत होत्याचं नव्हतं करून घेतलं. अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा पराभव झाला. इंग्लंड खऱ्या अर्थाने भरडली गेली. अ गटात न्यूझीलंड संघ अग्रस्थानी आहे. कारण त्यांचा रनरेट सध्या तरी भारतापेक्षा जास्त आहे. तिसऱ्या नंबरवर बांगलादेश तर चौथ्या नंबरवर यजमान पाकिस्तान. काल रावळपिंडीच्या पावसाने यजमानांचा पाय आणखीन खोलात गेला. कदाचित एक सामना जिंकून थोडीफार लाज राखता आली असती.
हा लेख वाचत असताना ऑस्ट्रेलियाविऊद्ध अफगाणिस्तानचा निकाल तुमच्या हातात आला असेल. जर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवलं तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका आपोआप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. परंतु अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला दे धक्का दिला तर मात्र अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचेल. या विजयापासून खरी गुंतागुंत वाढणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंड-साउथ आफ्रिका या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवला तर निर्विवादपणे ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील. परंतु जर का इंग्लंड जिंकली तर नेट रनरेटवर उपांत्य फेरीचा संघ निश्चित होईल. जर हा सामना पावसामुळे वॉशआऊट झाला तरीही ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीत पोहोचेल.
जर का अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर तो त्यांच्यासाठी मोठा बूस्टर डोस असेल. किंबहुना मुंबईतल्या पराभवाची परतफेड ते सव्याज करतील. दुसरीकडे जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर मात्र आम्ही पुन्हा एकदा झटपट क्रिकेटच्या अजिंक्यपदाकडे वाटचाल करत आहोत हे ते कदाचित हक्काने सांगतील. असो. निर्णय काय येतोय ते आपल्याला आज समजेलच. मी या स्पर्धेच्या माध्यमातून सतत म्हणत आलोय की ब गट हा प्रचंड तगडा आहे. यातील बलवान दोन संघ कोण? याचे उत्तर अ गटाप्रमाणे तुम्हाला लगेच मिळणार नाही. तुम्हाला थोडसं वेट अँड वॉच करावंच लागेल. मी सुऊवातीलाच म्हटलं होतं की स्पर्धा जरी दोन गटात लीग पद्धतीने खेळवली जात असली तरी प्रत्येक सामना हा जवळपास बाद फेरीचा ठरणार आहे. नेमकं तेच दृश्य आपल्याला पूर्ण स्पर्धेत विशेष करून ब गटात बघायला मिळते.
आयसीसीच्या मोठ्या इव्हेंटमध्ये आजकाल बलाढ्या संघांनी छोट्या संघांना गृहित धरणं सोडून दिले. ज्यांनी ज्यांनी गृहित धरलं ते अगदी रसातळास पोहोचले. अर्थात याला इतिहासही साक्ष आहे. 2007 मध्ये भारत तर 2023 मध्ये इंग्लंड ही त्यातलीच ज्वलंत उदाहरण. जगभरात आजकाल 365 दिवस क्रिकेट खेळले जाते. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर बलाढ्या संघ अपेक्षित विजय मिळवतात. कधी तो घासून असतो, तर कधी तो एकतर्फी. झटपट क्रिकेटचा विचार केला तर हे क्रिकेट थोडंसं अतिच होतय. यातच आयपीएल आणि बिग बॅश याची फोडणी सोबत असते. झटपट क्रिकेटमध्ये दादा संघ अधिकारवाणीने दादागिरी करू शकत नाहीत, हे आपण कित्येकदा पाहिलंय. आणि आयसीसी इव्हेंटच्या प्लॅटफॉर्मवर आपण वारंवार बघतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी इव्हेंटही त्याला अपवाद नाही
लिंबू टिम्बू संघांना ‘मामा’ बनवण्याचे दिवस कधीच संपले. बलाढ्या संघ दुसऱ्यांना मामा बनवता, बनवता आपण कधी मामा बनलो हे त्यांना कळलंच नाही. असो. अफगाणिस्तान विऊद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचा निकाल काही लागो परंतु आयसीसी इव्हेंटमध्ये मोठ्या संघांनी छोट्या संघांचा धसका घेतला आहे हेही तेवढेच खरं. क्रिकेट खूप बदललंय. त्यातलं तंत्र ही बदललंय. छोटे मोठे संघही मागे नाहीत हे विशेषत: आपण मागील दोन वर्षापासून बघतोय. याला या वर्षाची चॅम्पियन्स ट्रॉफी अपवाद नाही एवढं मात्र निश्चित.









