योगी आदित्यनाथ यांची सूचना : नुकसान भरून काढण्याचेही निर्देश
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच कायदा आणि सुव्यवस्थेच्या उच्चस्तरीय आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी संभल प्रकरणातील एकही जण सुटला जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच हिंसाचार पसरवणाऱ्यांपैकी कुणालाही सोडू नका अशी सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. संभलप्रमाणे अन्य कोणत्याही जिह्यात अराजकता पसरविण्याचे स्वातंत्र्य कोणालाही दिले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. बेकायदेशीर अतिक्रमण, चेन स्नॅचिंग आणि दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्य सचिव, डीजीपी आणि फिल्डमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. योगींनी विशेषत: गौतम बुद्ध नगर, अलिगढ आणि संभलची नावे घेत, कोणत्याही जिल्ह्यात अराजकता पसरवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही संबंधित हिंसाचारग्रस्तांकडून वसूल करण्यात यावा. अराजकता पसरवणाऱ्यांना ओळखा आणि त्यांची पोस्टर्स लावा. त्यांचा कसून शोध घ्या, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कायदा आणि सुव्यवस्थेचा उच्चस्तरीय आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक संघटनांकडून मिरवणूक, सभा इत्यादींचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात काही अनियंत्रित घटक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सर्व जिह्यांमध्ये आवश्यक ती व्यवस्था करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.









