राष्ट्रवादी आमदारांचे जिल्हाधिकारी कचेरीवर धरणे आंदोलन
सांगली प्रतिनिधी
कृष्णा नदी आणि नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले तरी शासन गांधारीची भूमिका घेत आहे. केवळ बैठकींचा फार्स न करता पाण्याचे वर्षभराचे तंतोतंत नियोजन करावे यासाठी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आमदार अरुण अण्णा लाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनास आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगभाऊ नाईक, प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार लाड म्हणाले, आज केवळ एक टीएमसी पाणी सोडून लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा पुरेसे पाणी कृष्णा नदीत सोडावे. तसेच कोयना, वारणा नदीत ही पाणी सोडण्याचे वर्षभराचे नियोजन व्हावे.कालवा समितीची बैठक तातडीने बोलवावी, शासनाला खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज मिळते ती घेऊन, मग कोयना धरणातून 67.50 टीएमसी पाणी वीजनिर्मिती करून ते समुद्रात मिसळते त्यातील पाणी वाचवून ते पाणी सिंचन आणि पिण्यासाठी वापरले तर परिसराचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल. कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये वारंवार पाणी सोडण्याची मागणी करून देखील पाणी सोडले नाही. लोकांच्या जीवाशी खेळून या सरकारला केवळ कागदी घोडे नाचवून कसलं राजकारण करायचं आहे? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. वास्तविक पाण्याचे वर्षभराचे शासनस्थरावरील नियोजन पाऊस व हवामानाचा अंदाज घेवून अगोदरच करणे आवश्यक होते, परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे शेतकऱ्यांनी व विविध शेतीपुरक संस्थांनी अनेकवेळा मागणी करुन देखील कोयना धरणातून पाणी सोडले गेले नाही. यामुळे मागील दहा दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पूर्णतः खालावली असून जागोजागी नदी पात्र कोरडे पडले आहे. या संपूर्ण बाबींमध्ये नियोजनाचा आभाव दिसून येत असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार मानसिंगभाऊ नाईक म्हणाले, 29 तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बोलवावेत आणि ते प्रेझेंटेशन केवळ फार्स न करता त्याला मंजुरी मिळेल असे असावे.आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करीत पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,टी व्ही पाटील, बाळासाहेब होनमोरे, देवराज पाटील, दत्ता पाटील, गौरव नायकवडी, जे.पी.लाड, शामराव पाटील, विजय पाटील, जयदीप यादव, तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचेसह जिल्ह्यातून इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंगाल देशाला खासदार शरद पवारांनी सुबत्ता आणली त्यामुळे त्यांच्यावर कोणीही टीका करताना पूर्ण अभ्यास करून टीका करावी, अपुऱ्या ज्ञानावर टीका करू नये असा टोला आमदार अरुण लाड यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला अनुसरून केला.








