वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूर येथे मंगळवारी 26 विरोधी पक्षांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल देखील सामील झाले होते. या बैठकीत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्युसिव्ह अलायन्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीपूर्वी काँग्रेसने केंद्र सरकारच्या दिल्ली अध्यादेशाप्रकरणी भूमिका स्पष्ट करत आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी स्वत:च्या पक्षाच्या सोशल मीडिया टीमला काँग्रेसविरोधात कुठलाच ट्विट न करण्याचा निर्देश दिला आहे.
तर काँग्रेसच्या अधिक्त ट्विटर हँडलवरून केजरीवालांचे बैठकीतील संबोधन शेअर करण्यात आल्याने दिल्लीतील काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. पाटणा येथे पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीदरम्यान सोशल मीडियासोबत प्रसारमाध्यमांमध्ये आप नेत्यांकडून करण्यात आलेल्या काँग्रेसविरोधी वक्तव्यांची जाणीव केजरीवालांना करून देण्यात आली होती. यानंतरच आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाने स्वत:च्या सोशल मीडिया टीमला काँग्रेसवर टीका करणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
आप सोशल मीडिया टीमला नजीकच्या भविष्यात काँग्रेसविरोधात कुठलीच पोस्ट अपलोड न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर आम आदमी पक्षाच्या पंजाब अन् दिल्लीमधील नेत्यांनी काँग्रेस विरोधात नरमाईची भूमिका स्वीकारण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस अन् आप हे परस्परांच्या विरोधात आहेत. आपने पंजाबमध्ये काँग्रेसला पराभूत करत सत्ता मिळविली आहे. तर दिल्लीत आपमुळे काँग्रेसचे अस्तित्व संकटात सापडले आहे. या दोन्ही पक्षांची मतपेढी एकच असल्याने भविष्यात राजकीय संकट उभे राहणार आहे.









